महाविद्यालयांनी अनावश्यक फी रद्द कराव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:21+5:302021-06-10T04:26:21+5:30
मसूर : कोरोनाची महाभयंकर परिस्थिती पाहता, महाविद्यालयातील विविध अनावश्यक विभागांच्या फी रद्द कराव्यात तसेच ट्यूशन फीमध्ये ५० टक्के सवलत ...
मसूर : कोरोनाची महाभयंकर परिस्थिती पाहता, महाविद्यालयातील विविध अनावश्यक विभागांच्या फी रद्द कराव्यात तसेच ट्यूशन फीमध्ये ५० टक्के सवलत मिळावी, यासाठी सुमारे ४० लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मंत्र्यांकडे शिफारस करूनही अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. जर १० जूनपर्यंत सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही तर विद्यार्थी संपूर्ण राज्यात सरकारविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील, असा इशारा संयुक्त विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्यचे प्रदेशाध्यक्ष संकेत कचरे यांनी इतर सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीची पार्श्वभूमी पाहता, महाविद्यालयातील विविध अनावश्यक विभागांच्या फी रद्द करण्यासाठी तसेच ट्यूशन फीमध्ये ५० टक्के सवलत मिळण्यासाठी गेले आठ ते नऊ महिने संयुक्त विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी वैयक्तिक पातळीवर आणि एक ते दीड महिना संघटनात्मक पातळीवर सातत्याने लढा देत आहेत. अशाप्रकारची चळवळ सुरू करत असताना जवळपास ४०हून अधिक लोकप्रतिनिधींसोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात भेटून चर्चा केली. या चर्चेदरम्यान बहुतांशी लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्याकडे शिफारसदेखील केली. दरम्यानच्या काळात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रथमेश निकम, प्रदेशाध्यक्ष संकेत कचरे, प्रदेश महासचिव संकेत पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष स्वप्नील पवार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची दोनवेळा प्रत्यक्ष भेट घेत परिस्थितीची आणि संघटनेच्या मागणीची विस्तृत माहिती दिली. यावर मंत्र्यांनी बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप कसल्याही प्रकारची बैठक सरकारद्वारे आयोजित झाली नाही.
दरम्यान, दि. ४ मे २०२१ रोजी संयुक्त विद्यार्थी संघटनेच्या झालेल्या बैठकीत चर्चेअंती जर दि. १० जूनपर्यंत सरकारद्वारे कोणताही निर्णय घेण्यात आला नाही तर समस्त विद्यार्थीवर्गासह संपूर्ण राज्यात सरकारविरुद्ध तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याची भूमिका प्रदेशाध्यक्ष आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर जाहीर केली आहे. या बैठकीला सातारा जिल्हा युवती जिल्हाध्यक्ष सुनीता जाधव-बाबर, कऱ्हाड तालुकाध्यक्ष कोमल चव्हाण, कार्याध्यक्ष कला शाखा रेणुका कोळी, प्रवक्ता वाणिज्य शाखा ईश्वरी देव, संघटक अभियांत्रिकी शाखा अस्मिता जाधव उपस्थित होत्या.