रंग बदलला तरी म्हणे पाणी शुद्धच!

By Admin | Published: February 4, 2015 10:29 PM2015-02-04T22:29:21+5:302015-02-04T23:55:52+5:30

कऱ्हाड पालिकेचा जावईशोध : कायमस्वरूपी उपाययोजना नाही; नागरिकही बुचकळ्यात

The color changed, but the water was pure! | रंग बदलला तरी म्हणे पाणी शुद्धच!

रंग बदलला तरी म्हणे पाणी शुद्धच!

googlenewsNext

कऱ्हाड : शहराला दूषित पाणीपुरवठा होत असल्याची सर्वत्र ओरड सुरू असताना पालिकेने मात्र शहराला पुरविण्यात येणारे पाणी शंभर टक्के शुद्धच असल्याचा दावा केला आहे. पाण्याचा रंग बदलला असला तरी ते पाणी पूर्णपणे निर्जंतुक असल्याचेही पालिकेचे जलअभियंता छातीठोकपणे सांगत आहेत. पालिकेने लावलेल्या या जावईशोधामुळे नागरिक आणखी बुचकळ्यात पडले आहेत. कृष्णा नदीतील दूषित पाण्यामुळे कऱ्हाड शहरासह आसपासच्या गावांतील नागरिकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या नदीतील पाण्याचा रंग बदलला आहे. पाणी पिवळे व काळसर रंगाचे दिसत असून, ते अशुद्ध असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पासाठी कृष्णा नदीचे पाणी टेंभूजवळ अडविण्यात आले आहे. या पाण्याचा फुगवटा कोयना नदीवरील नवीन पुलापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे नदीतील पाणी साचून राहिले असून ठिकठिकाणी शेवाळ साचले आहे. नदीपात्रात सांडपाणीही मिसळत असल्याने हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे अनेक संघटनांकडून सांगितले जात आहे. गढूळ व दुर्गंधीयुक्त पाण्याचा शहराला पुरवठा केला जात असल्याचा आरोपही संघटना करीत आहेत. यामुळे साथरोग पसरत असून, अनेकांना त्वचारोगाचा सामनाही करावा लागत आहे. कऱ्हाड शहर परिसरात लहान-मोठे उद्योग, हॉटेल, रूग्णालये तसेच अन्य प्रकल्प आहेत. या ठिकाणचे सांडपाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्याचबरोबर शहरातील बाराडबरी येथे एकत्रित करण्यात आलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र, तेथील कचरा साठविण्याची क्षमताही संपल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. शहरातील नाल्यांमधून ओला व सुका कचरा वाहत असल्याचे अनेकवेळा पाहावयास मिळाले आहे. तसेच मैलामिश्रित पाणीही नदीपात्रापर्यंत पोहोचत आहे. वास्तविक, नदीत मिसळणारे मैलामिश्रित पाणी नदीपर्यंत जाऊ न देता त्याची विल्हेवाट लावावी, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दोन वर्षांपूर्वीच सांगण्यात आले आहे. मात्र, पालिकेने दुर्लक्ष केले. आजपर्यंत पालिकेने त्याबाबत कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यातच काही दिवसांपासून शहराला पिवळसर काळा रंग चढलेल्या पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. मनसेने याबाबत आवाज उठविला असला तरी शहराला पुरविण्यात येणारे पाणी शुद्ध असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पालिकेच्या भूमिकेबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. (प्रतिनिधी)

प्रदूषणाचा प्रश्न गंभीर
टेंभू प्रकल्पानजीक झालेल्या पाणीसाठ्यापेक्षा इतर ठिकाणीही पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. सातारा, वाई येथील पाणी वाहत या ठिकाणी येते. त्यामुळे पाणी प्रदूषणाचा विषय खूपच गंभीर आहे. टेंभू प्रकल्प बंद असतानाही येथे पाणी अडविले जाते, हे चुकीचे आहे. खासगी वीज कंपनीसाठी हे पाणी अडविले जात असून त्याला आमचा विरोध आहे.
- सागर बर्गे, शहराध्यक्ष, मनसे

Web Title: The color changed, but the water was pure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.