कीर्तनाची रंगत... सोडली तंबाखूची संगत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 11:56 PM2018-02-04T23:56:58+5:302018-02-04T23:57:29+5:30
तीनशे तरुणांनी फेकल्या पुड्या : आश्रमातल्या भिंतींवरही व्यसनमुक्तीचे फोटो; सुभाष घाडगे यांचे कार्य
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कीर्तन, प्रवचन करणाºया महाराजांवर लोकांची श्रद्धा असते. श्रद्धेचा सकारात्मक वापर केल्यावर काय होऊ शकतं? याचा प्रत्यय सातारा जिल्ह्यात अनुभवास मिळत आहे. माण तालुक्यातील जाधववाडीतील सुभाषमहाराज घाडगे गेली ३२ वर्षे व्यसनमुक्तीवर कीर्तन करतात. त्यामुळे तब्बल तीनशेहून अधिकजणांनी तंबाखू, मिश्रीची यज्ञात आहुती दिली आहे.
जाधववाडी येथील घाडगे यांची चौथी पिढी कीर्तनसेवा करत आहे. त्यांचा जाधववाडीत सेवासूर्य आश्रम आहे. सुभाष घाडगे हे वयाच्या २२ व्या वर्षापासून कीर्तन करतात. सुरुवातीला ते अध्यात्मावर कीर्तन देत. शंकरमहाराज रसाळ व किसनमहाराज घाडगे यांचे शिष्य असलेल्या घाडगेमहाराजांनी अध्यात्माला व्यसनमुक्तीची जोड दिली. कीर्तनाच्या वेळी संत तुकाराम महराजांच्या अभंगांचे दाखले देत व्यसनामुळे होणारा आर्थिक खर्च अन् आयुष्याचं गणितच मांडतात. एखाद्या तरुणाला उभं केलं जातं. त्याला वय विचारून दिवसाला किती पुड्या तंबाखू खातोस? हे विचारलं जातं. दिवसाला किती रुपयांची तंबाखू व चुना खातो, यावरून महिना, वर्ष अन् आयुष्याचं गणित मांडलं जातं. आयुष्यात लाखो रुपयांची तंबाखू खाऊन रस्त्यावर थुंकता, त्याचा तुम्हाला अन् समाजाला काहीच उपयोग नाही, हे पटवून सांगितलं जातं. त्यानंतर अध्यात्माचा आधार घेऊन तुळशीच्या माळेचे पावित्र्य सांगितले जाते. कीर्तन संपल्यानंतर उपरण्यात यज्ञ म्हणून खोकं घेऊन महाराज भक्तांमधून फिरतात. खरंच तंबाखू सोडणार असाल तर तुळशीच्या माळेला स्पर्श करून तंबाखूची पुडी यज्ञात टाकण्यास सांगितली जाते अन् लोकही प्रामाणिकपणे तंबाखूची पुडी काढून यज्ञात टाकतात. यामध्ये महिलाही मिश्रीची आहुती देतात.
एवढ्यावरच सुभाषमहाराज घाडगे यांचे कार्य थांबत नाही. कीर्तन झाल्यावर संबंधित तरुणांच्या आई-वडिलांना बोलावलं जातं. त्यांच्याशी संवाद साधून ‘तुमचा मुलगा आजवर तंबाखू खात होता; पण त्याने प्रामाणिकपणे कबूल केल्याने तुम्हीही माफ करा अन् तुम्ही तंबाखू खात असल्यास सोडून द्या. तंबाखू, मिश्रीमध्ये विष असतं, ते घातक असल्याने खाऊ नका, असे आवाहन केलं जातं. त्यामुळे अनेक पालकही व्यसनमुक्त झाले आहेत.
चित्रफीत अन् व्हॉट्सअॅप...
सुभाषमहाराज आधुनिकतेचा वापर करतात. व्हिडीओ चित्रफीत दाखविली जाते. माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार हे स्वत: अनुभव सांगतात. तसेच व्यसनमुक्त झालेल्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप केला आहे. त्यावरून प्रबोधन करतात.
आश्रमात आंतरबाह्य बदल...
सुभाषमहाराज घाडगे यांनी जाधववाडी येथील आश्रमातही मोठा बदल घडविला आहे. आश्रमात देवदेवतांचे फोटो होते. त्याजागी व्यसनमुक्तीचे संदेश देणारे फलक, कर्करोग झालेल्या व्यक्तीचे फोटो त्याशेजारी रिकामा फोटो लावलेला असतो. त्यामुळे या आश्रमात आल्यानंतर माणूस बदलूनच जातो.