मलकापुरात स्वच्छतेसह ठिकठिकाणी रंगीत कारंजाचे फवारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:22 AM2021-03-30T04:22:06+5:302021-03-30T04:22:06+5:30

मलकापूर : मलकापुरात स्वच्छ सर्वेक्षण २०२१ ची जोरात तयारी सुरू आहे. टाकाऊपासून टिकाऊ पद्धतीने उड्डाणपुलाखाली व चौकाचौकांत सुशोभीकरण करण्यात ...

Colorful fountains in Malkapur with cleanliness | मलकापुरात स्वच्छतेसह ठिकठिकाणी रंगीत कारंजाचे फवारे

मलकापुरात स्वच्छतेसह ठिकठिकाणी रंगीत कारंजाचे फवारे

Next

मलकापूर : मलकापुरात स्वच्छ सर्वेक्षण २०२१ ची जोरात तयारी सुरू आहे. टाकाऊपासून टिकाऊ पद्धतीने उड्डाणपुलाखाली व चौकाचौकांत सुशोभीकरण करण्यात आले आहे, तर शहरात ठिकठिकाणी रंगीत कारंजाचे फवारे उडविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आगाशिवनगरात दत्त शिवम् व झेडपी कॉलनीतील रंगीत कारजांचे फवारे उडत असल्यामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे.

स्वच्छतेच्या अनुषंगाने देशातील सर्व नगरपालिकांमध्ये दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा राबविली जाते. मलकापूर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२० स्पर्धेत नागरिकांच्या सक्रिय सहभागातून आपल्या शहराला देशपातळीवर २५ वा, पश्चिम भारतात ११ वा, तर महाराष्ट्रात १० वा क्रमांक मिळवला. त्याच्या पुढे जाऊन यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी जोमाने काम करत देशात पहिल्या पाचमध्ये येण्याची तयारी ठेवली आहे. त्यानुसार मलकापूर पालिकेमार्फत प्लास्टिक बंदी, श्रमदान व प्रबोधनपर जनजागृती बैठका, आदी कार्यक्रमांचे नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.

विविध मार्गाने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधराबाबत जनजागृती करण्याची शहरात सध्या धूम सुरू आहे. नागरिकही त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. प्रबोधन बैठकीदरम्यान स्वच्छ सर्वेक्षणच्या प्रश्नावलीची संपूर्ण माहिती व त्याची उजळणी नगराध्यक्षा नीलम येडगे यांनी घेतली. कचऱ्याचे व्यवस्थापन, दैनंदिन रस्तेसफाई, माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत वृक्षलागवड करून मलकापूर शहर अजून हरित करण्याचा निर्धार केला. शहरास पाच स्टार मानांकन, वॉटर प्लस मानांकनासह शहर स्वच्छतेबाबतचे नियोजन पालिकेने केले आहे. नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, सभापती राजेंद्र यादव, प्रशांत चांदे, शकुंतला शिंगण, स्वाती तुपे, नगरसेविका आनंदी शिंदे, नंदा भोसले, गीतांजली पाटील, अलका जगदाळे, कमल कुराडे, भारती पाटील, पूजा चव्हाण, माधुरी पवार, नूरजहान मुल्ला, नगरसेवक कृष्णत येडगे, सागर जाधव, आनंदराव सुतार, नगरपरिषद अधिकारी, आशासेविका व अंगणवाडी सेविकांसह सर्व पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे.

उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह नगरसेवकांनी शहरात प्रबोधन व सुशोभीकरणावर भर दिला आहे. शहर सुशोभीकरणात चौकाचौकांत सुशोभीकरण व शहरात मोक्याच्या ठिकाणी कारंजे तयार केले आहेत. बांधकाम अभियंता शशिकांत पवार यांच्या टीमने दत्त शिवम् व झेड पी कॉलनीतील रंगीत कारंजाची नुकतीच चाचणी घेतली. शहरात रंगीत कारंजाचे फवारे उडत असल्यामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. इतर ठिकाणीही कारंजे बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

चौकट

सेल्फी पॉईंटचे आकर्षण

मलकापूरच्या चोविस तास पाणीपुरवठा योजनेमुळे मलकापूरचे नाव देशपातळीवर गाजले. त्याचाच धागा पकडून पाणीपुरवठा विभागाने विद्युत रोषणाई करून आकर्षक सेल्फी पॉईंट तयार केला आहे. हा सेल्फी पॉईंट शहरातील नागरिकांसह पाणी योजना पाहणीसाठी येणाऱ्या नागरिकांचे आकर्षण ठरत आहे.

फोटो २९मलकापूर कारंजे

मलकापूर येथील दत्त शिवम हौसिंग सोसायटीत कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यालगत तयार केलेले रंगीत कारंजे नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. (छाया : माणिक डोंगरे)

Web Title: Colorful fountains in Malkapur with cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.