काॅलम - कृष्णा कारखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:47+5:302021-06-11T04:26:47+5:30
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी ...
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भोसले पॅनलला रोखण्यासाठी माजी अध्यक्ष दोन मोहितेंच्या रयत व संस्थापक पॅनलच्या एकत्रिकरणासाठी बरेच प्रयत्न झाले, पण त्याला यश आले नाही. त्यामुळे या मनोमिलनासाठी पुढाकार घेणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ॲड. उदयसिंह पाटील यांची आता सत्वपरीक्षा होणार आहे.
कऱ्हाड दक्षिणला गत विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा यात विजय झाला होता तर भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले व बंडखोर ॲड. उदयसिंह पाटील यांचा पराभव झाला होता. मात्र, निकालाच्या दुसऱ्याच दिवशी ॲड. उदयसिंह पाटील हे नवनिर्वाचित आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी पुष्पगुच्छ घेऊन अभिनंदनासाठी पोहोचले होते. त्यामुळे अनेक राजकीय धुरिणांना एक धक्काच बसला होता. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण-विलासराव पाटील यांच्यात मनोमिलनाचा अधिकृत कार्यक्रम झाला असो.
या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते या दोघांचाही पाठिंबा होता. चव्हाणांच्या विजयात दोन्ही मोहितेंचा नक्कीच वाटा आहे. आता त्यातून उतराई होण्याची चव्हाणांची वेळ आहे. पण मनोमिलनाच्या प्रयत्नांना यश न आल्याने दोन्ही मोहितेंनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय; अशावेळी कोणाला व कसा पाठिंबा द्यायचा, याची परीक्षा चव्हाणांना द्यावी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अविनाश मोहितेंनी आघाडी धर्माचे पालन केले. त्यांनी काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांना पाठिंबा दिला. प्रचारातही सक्रिय झाले. तर काँग्रेस विचाराचे पाईक असणाऱ्या डॉ. इंद्रजीत मोहितेंनीही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रचार केला होता. वास्तविक त्यावेळी त्यांचे पुतणे डॉ. अतुल भोसले हे चव्हाण यांच्याविरोधात उभे होते. तरीही घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी चव्हाणांची पाठराखण केली होती. आता या दोघांपैकी एका मोहितेंची निवड कशी करायची, हा चव्हाणांसमोर नक्कीच मोठा प्रश्न आहे.
कऱ्हाड दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. तो अभेद्य ठेवण्यासाठी काय करावे लागेल, याचा विचार पृथ्वीराज चव्हाण यांना नक्कीच करावा लागणार आहे. कारण प्रत्येक निवडणुकीची समीकरणे ही बदलत राहतात, हे पृथ्वीराज चव्हाण यांना निश्चितच माहीत आहे.
ॲड. उदयसिंह पाटीलही आता काँग्रेसच्या मूळ प्रवाहात सामील झालेत. कऱ्हाड दक्षिणचे प्रतिनिधित्व त्यांचे वडील माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी सलग ३५ वर्षे केलेले आहे. त्यामुळे कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेस बळकट करण्यासाठीचा निर्णय घ्यायचा की अन्य काही मार्ग निवडायचा, हे सुद्धा त्यांना ठरवावे लागणार आहे.
राजकारणात रोज नवनवीन स्थित्यंतरे घडत असतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तर आता स्वबळाची भाषा करू लागले आहेत. उद्या राज्यातील आघाडीत बिघाडी झाली तर काॅंग्रेससोबत कोण असणार, याचाही विचार या दोघांना करावा लागणार आहे. हे दोन्ही नेते भविष्याचा वेध घेऊन निर्णय घेतील, अशी आशा करायला हरकत नाही. पण हा निर्णय घेताना त्यांची सत्वपरीक्षा होणार हे निश्चित !
प्रमोद सुकरे ,कऱ्हाड