कोरोना लसीकरणासाठी पुढे यावे : विनय गौडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:58 AM2021-02-23T04:58:54+5:302021-02-23T04:58:54+5:30
सातारा : ‘जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरणाचे काम वेगात सुरू असून उर्वरित आरोग्य कर्मचारी आणि नोंदणीकृत फ्रंटलाईन वर्कर्सनी लसीकरणासाठी पुढे यावे. ...
सातारा : ‘जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरणाचे काम वेगात सुरू असून उर्वरित आरोग्य कर्मचारी आणि नोंदणीकृत फ्रंटलाईन वर्कर्सनी लसीकरणासाठी पुढे यावे. संबंधितांनी कोणत्याही जवळच्या लसीकरण सेंटरवर लवकर लस टोचून घ्यावी,’ असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा म्हणाले, ‘जिल्ह्यात सर्वच पातळीवर कोरोनावर नियंत्रण आणण्याचे काम प्रशासन करीत आहे. त्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून लसीकरण सुरू आहे. हेल्थकेअर वर्कर्स म्हणजेच आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या २६ हजार आहे. आतापर्यंत संबंधितांचे ७२ टक्के लसीकरण प्रथम टप्प्यात झालेले आहे. तसेच आघाडीवर काम करणारे कर्मचारी म्हणजेच फ्रंटलाईन वर्कर्स २० हजार आहेत. यामधील ७१ टक्के कर्मचाऱ्यांचे प्रथम लसीकरण झाले आहे. नोंदणीकृत लाभार्थी ४६ हजार आहेत. त्यापैकी तब्बल ३३ हजार लाभार्थ्यांचे लसीकरण झालेले आहे. याची टक्केवारी ७१ आहे. एकूणच ७० टक्क्यांहून अधिक लसीकरण झालेले आहे. ही समाधानकारक बाब असली तरी १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे.
आरोग्य यंत्रणेसह सर्व संबंधित यंत्रणा कोरोना नियंत्रणासाठी रात्रंदिवस झटत असून प्रबोधनही करण्यात येत आहे. मास्क वापरणे, सामाजिक अंतर आणि वारंवार हात धुणे अशी त्रिसूत्री नागरिकांनी काटेकोरपणे पाळावी,’ असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी केले आहे.
..............................................................