CoronaVirus : साताऱ्यासाठी दिलासादायक, तब्बल १३८ जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 01:42 PM2020-06-13T13:42:37+5:302020-06-13T13:44:23+5:30
झोपेतून उठल्यानंतर कोरोनाचे आता किती रुग्ण सापडतील, अशी रोज सकाळी चर्चा करतच अनेकजण आपापल्या कामात मग्न होतात. शनिवारची सकाळ मात्र, सातारा जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी घेऊन आली. तब्बल १३८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला.
सातारा : झोपेतून उठल्यानंतर कोरोनाचे आता किती रुग्ण सापडतील, अशी रोज सकाळी चर्चा करतच अनेकजण आपापल्या कामात मग्न होतात. शनिवारची सकाळ मात्र, सातारा जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी घेऊन आली. तब्बल १३८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची साखळी वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांच्या ह्दयाची धडधड वाढली आहे. जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आकडा ७१८ वर पोहोचला आहे. रोज नवे बाधित रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी सकाळी १३८ जणांचा अहवाल प्राप्त झाला. विशेष म्हणजे यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्याची आशा निर्माण झाली आहे.
दरम्यान, वाई तालुक्यातील बावधन येथील ५३ वर्षीय महिलेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. संबंधित महिलेला सुरुवातीपासून ह्द्यविकार व फुफ्फुसाचा आजार होता. दहा दिवसांपासून घरीच श्वसनाचा त्रास चालू झाल्याने संबंधित महिलेला वाईमधील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, अचानक प्रकृती बिघडल्याने महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी सकाळी मृत्यू झाला. या मृत महिलेचा कोरोना संशयित म्हणून नमुना पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत ७१८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यापैकी ४७२ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या २१३ कोरोना बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.