वरकुटे-मलवडीत आयसोलेशन सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:37 AM2021-05-16T04:37:44+5:302021-05-16T04:37:44+5:30
वरकुटे-मलवडी : ‘माण तालुक्यातील खेडोपाड्यात कोरोनाच्या संसर्गाचा कहर झाला असून, रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याने सर्वत्र लोकांची धावपळ होत ...
वरकुटे-मलवडी :
‘माण तालुक्यातील खेडोपाड्यात कोरोनाच्या संसर्गाचा कहर झाला असून, रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याने सर्वत्र लोकांची धावपळ होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस ताणतणाव आणि काळजाचे ठोके वाढतच असल्याने माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी परिसरातील गोरगरीब गरजूू रुग्णांना गावातच प्राथमिक उपचार उपलब्ध करून कोरोनामुक्त करण्यासाठी अभयसिंह जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून गावातील लोकवर्गणीतून अद्ययावत कोरोना उपचार विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे.
वरकुटे-मलवडीतील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या ठिकाणी संकल्प कोविड सेंटरचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, डॉ. रोहन मोडासे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप, म्हसवडचे नगरसेवक युवराज सूर्यवंशी, सरपंच अंकुश गाढवे, मार्केट कमिटीचे संचालक कैलास भोरे, डॉ. नानासो रुपनवर, डॉ. विकास जगताप, बाळासाहेब आटपाडकर, सजंय खिल्लारी, विजय जगताप, गजेंद्र जगताप, सजंय जगताप, जालिंदर वाघमोडे, दिलीप खरात, साहेबराव खरात, धीरज जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना रुग्णांचे मनोबल उंचावण्यासाठी ग्रामस्थांच्या सहभागातून आणि माणदेश फाउंडेशनच्या सहकार्यातून सुरू केलेले वरकुटे-मलवडीतील संकल्प कोविड सेंटरमध्ये ६० बेडची व्यवस्था केली असून, ७ ऑक्सिजन बेड, अद्ययावत रुग्णवाहिका यासारख्या कोविड हाॅस्पिटलच्या सर्व सुविधा याठिकाणी मिळणार आहेत. प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही बसवण्यात आले असून, रात्रंदिवस रुग्ण डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहणार आहेत. यामुळे पंचक्रोशीतील कोरोना रुग्णांना संकल्प कोविड सेंटरच्या माध्यमातून आपल्याच मायभूमीत अद्ययावत उपचार उपलब्ध झाल्याने, कोरोनाला हद्दपार करण्याची नवीन ऊर्जा मिळणार आहे. आपल्याच माणसांत वावरत असल्याची भावना निर्माण होऊन आत्मविश्वासाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण लवकरच बरे होण्याची संभावना निर्माण झाली आहे.
(कोट)..
आमची माणसं आमची जबाबदारी समजून वरकुटे-मलवडीत लोकसहभागातून संकल्प कोविड सेंटर सुरू केले आहे. पंचक्रोशी कोरोनामुक्त होण्यासाठी हाती घेतलेला उपक्रम कडेवर घेऊन जाण्याकरिता अनेक दानशूर मंडळींनी मदत देऊ केली आहे. आणखी लागेल ती मदत करण्यास आम्ही सर्वजण तयार आहे. येथील जनतेला खऱ्या अर्थाने आधार देण्याचे काम या ठिकाणी होणार आहे.
- अभयसिंह जगताप, सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस युवक
१५वरकुटे मलवडी
फोटो-वरकुटे-मलवडीत संकल्प कोविड सेंटरचे उद्घाटन करताना डॉ. लक्ष्मण कोडलकर, डॉ. रोहन मोडासे, अभयसिंह जगताप यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.