समिती कागदावर; झाडं लावणार कोण ?

By Admin | Published: June 6, 2017 09:57 PM2017-06-06T21:57:29+5:302017-06-06T21:57:53+5:30

कऱ्हाड पालिका : नगरसेवकांकडून ‘आगळ्या-वेगळ्या’ पद्धतीने पर्यावरण दिन साजरा; महिना उलटला तरी सदस्य निवडीकडे दुर्लक्ष--बातमीमागचीबातमी

Committee on paper; Who will plant trees? | समिती कागदावर; झाडं लावणार कोण ?

समिती कागदावर; झाडं लावणार कोण ?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन. हा दिवस मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयासह पालिकेतही यावेळी पर्यावरण दिनाचे आयोजन करण्यात आले. शहरातील एन्व्हायरो फ्रेन्डस नेचर क्लबच्यावतीने तर शहरातून शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन पर्यावरण जनजागर सायकल रॅलीही काढण्यात आली. अशात गेल्या महिनाभरापासून सदस्य निवडीविना घोषीत करण्यात आलेल्या वृक्षप्राधिकरण समितीकडे दुर्लक्ष करीत नगरसेवकांनी सोमवारी पालिका कर्मचाऱ्यांना रोपांचे वाटप केले खरे. मात्र, बसस्थानक परिसरातील ईदगाह मैदान आवारातकाही नगरसेवकांनी रूसत-फुगत वृक्षारोपन करीत आगळावेगळा पर्यावरण दिनही साजरा केला.
पालिकेत गेल्या महिनाभरापूर्वी नुसती घोषणा केलेल्या व आक्षेपामुळे सदस्यांच्या निवडी बाकी राहिलेल्या वृक्षप्राधिकरण समितीचा वाद अजून मिटला मिटलेला नाही. समिती स्थापनेबाबत सर्वस्वी नगराध्यक्षांना अधिकार आहे. मात्र, एक महिना होत आला तरी अद्यापपर्यंत नगराध्यक्षांकडून काहीच कार्यवाही केली जात नसल्याने समितीतील सदस्यांच्या निवडीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पालिकेच्यावतीने सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमास अनेक नगरसेवकांनी ‘मनापासून’ प्रतिसाद दिला. नगरसेवक सुहास जगताप यांनी तर पालिकेतील कर्मचाऱ्यांना रोपांचे वाटपही केले. त्यामुळे पालिकेतील कर्मचारीही भारावून गेले.
मात्र, त्यानंतर काही नगरसेवकांच्या नियोजनातून शहरातील ईदगाह मैदान परिसरात पर्यावरण दिनानिमित्त पन्नास वृक्षांचे रोपन करण्याचा नियोजित कार्यक्रम राबविण्यात आला. त्याठिकाणी मात्र वृक्षारोपनावेळी अनेक नगरसेवकांमध्ये रूसवे-फुगव्यांचे नाट्य घडल्याची चर्चा पालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये केली जात आहे. वास्तविक कार्यक्रमास नगराध्यक्षा दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उशीरा आल्यामुळे अगोदरच तासभर वेळ झालेल्या कार्यक्रमास अधिकच उशीर झाला.
प्रत्यक्षात नगराध्यक्षा आल्यानंतर सत्कार कार्यक्रमावेळी ‘पुष्पगुच्छ’ देण्याच्या कारणावरून अनेकांमध्ये नाराजी दिसून आली. त्याचा परिणामी काही नगरसेवकांनी कार्यक्रमावेळी वृक्षारोपन करण्याकडे पाठ फिरविली असल्याची चर्चा आता पालिका कर्मचाऱ्यांमध्ये केली जाऊ लागली आहे.
पालिकेच्या आवारात सोमवारी सकाळी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या अनुपस्थितीत उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, कऱ्हाड जिमखाना क्लबचे अध्यक्ष सुधिर एकांडे, जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नगरसेविका विद्या पावसकर, अंजली कुंभार, आरोग्य विभागाचे सभापती विजय वाटेगावकर, सुरेश पाटील, गजेंद्र कांबळे, महेश कांबळे, शिवराज इंगवले यांच्या उपस्थिती नगरसेवक सुहास जगताप यांच्या हस्ते पालिका कर्मचाऱ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास काहींना तर आमंत्रित करण्यात आले होते तर काहींना नसल्याचीही चर्चा पालिका वर्तुळात केली जात आहे.
अगोदरच राजकीय फांद्या फुटलेल्या या वृक्षप्राधिकरण समितीत आता सत्काराच्या कारणावरून अनेक नगरसेवक सदस्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. मात्र, प्रत्यक्षात रोपांचे वाटप करून वृक्षारोपनाचा संदेश देणाऱ्या तसेच वृक्षा रोपनाबाबत आवाहन करणाऱ्या नगरसेवकांपैकी कोण कोण झाडे लावणार? तसेच त्यांच्याकडून शहरातील वृक्षसंवर्धनासाठी कामे केली जातील का? असा सवाल कऱ्हाडकर नागरिक विचारत आहेत.
ईदगाह मैदान परिसरात पालिका नगरसेवकांच्या उपस्थितीत घडलेल्या नाराजीच्या नाट्यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी विनायक औंधकर, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, वृक्ष प्राधिकरण समितीतील अधिकारी मिलिंद शिंदे, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, नगरसेवक मोहसिन आंबेकरी, वैभव हिंगमीरे, गजेंद्र कांबळे, बाळासाहेब यादव, महेश कांबळे, घनश्याम पेंढारकर, एन्व्हायरो नेचर फ्रेन्डस क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशिद, चंद्रकांत जाधव आदिंसह नागरिकांनी उपस्थिती लावली होती.



लोकप्रतिनिधींमधून उदासीनतेचे दर्शन
गेल्या पाच वर्षापासून शहरात वृक्षसंवर्धनासाठी पालिकेतील लोकप्रतिनिधींकडून किती उपक्रम राबवले गेले आहेत. याबाबत संशोधन करणे गरजेचे आहे. अशात पर्यावरण दिना दिवशी ईदगाह मैदान परिसरात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपनाच्या कार्यक्रमावेळी अनेक लोकप्रतिनिधींकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद न दिला गेल्यामुळे त्यांच्यातून उदासीनता असल्याची चर्चा कार्यक्रमावेळी उपस्थितांमध्ये केली जात होती. घेतला जात नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.


पर्यावरण दिन झाला तरी अद्यापही नावे ‘अ’ निश्चित !
पालिकेतील वृक्षप्राधिकरण समितीत एकूण नगरसेवकांपैकी किमान ५ ते कमाल १५ सदस्य नियुक्त करावे, असे महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्षसंवर्धन व जतन कायद्यात नमूद करण्यात आले आहे. समाविष्ठ सदस्य हे जुनेच असल्याने या निवडी या राजकीय पुनर्वसनातून करण्यात आल्याची टिका झाली आहे. त्यामुळे समिती स्थापन करण्यात आलेली आहे खरी मात्र, त्यातील नावे अजूनही ‘अ’ निश्चित आहेत. आता पर्यावरण दिन साजरा करण्यात आला असून अद्यापही नगराध्यक्षांकडून नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.

अर्थसंकल्पात अडीच लाखांची तरतुद
कऱ्हाड पालिकेचा १२९ कोटी रूपयांचा कामांचा सन २०१७-१८ वर्षाचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांनी सादर केला. त्यामध्ये शहरातील वृक्षांचे रोपन व वृक्षसंवर्धनासाठी तब्बल २ लाख ५० हजार रूपयांची तरतुद केलेली आहे. वर्षभरात ही रक्कम शहरातील वृक्षसंवर्धनासाठी वापरणे गरजेचे आहे.



दहा वर्षातून होतेय वृक्षगणना !
राज्यातील प्रत्येक नगरपालिका, महानगरपालिकेच्या हद्दीतील वृक्षांची गणना दर दहा वर्षांनी केली जाते. मात्र, कऱ्हाड पालिकेकडून यापूर्वी देखील वृक्षगणना करण्यात आली होती का ? तसेच सहा वर्षे पूर्ण झाली तरी अद्यापही पालिकेस शहरात वृक्षांची संख्या किती आहे हे सांगता येत नाही, असे अनेक प्रश्न पर्यावरण प्रेमींमधून विचारले जात आहेत.

Web Title: Committee on paper; Who will plant trees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.