सफाई कामगारांच्या घरावरून सभेत गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:26 AM2021-07-10T04:26:39+5:302021-07-10T04:26:39+5:30
कऱ्हाड : येथील नगरपालिकेच्या मालकीच्या पार्ले येथील जागेत सफाई कर्मचाऱ्यांना जागा व घरे बांधून देण्याच्या विषयावरून पालिकेच्या विशेष सभेत ...
कऱ्हाड : येथील नगरपालिकेच्या मालकीच्या पार्ले येथील जागेत सफाई कर्मचाऱ्यांना जागा व घरे बांधून देण्याच्या विषयावरून पालिकेच्या विशेष सभेत चांगलाच गदारोळ झाला. सफाई कर्मचाऱ्यांना जागा व घरे देण्याच्या विषयासह प्रसिद्ध केलेल्या अजेंड्यातील दहा विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. यापुढील पालिकेच्या सभा ऑनलाईनऐवजी ऑफलाईन घेण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्याचबरोबर पालिकेची सर्वसाधारण सभा का बोलावली नाही? असा प्रश्न करत नगरसेवकांनी चांगलाच वादही घातल्याने ही सभा काहीशा गदारोळात पार पडली.
नगरपालिकेची विशेष सभा गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने पार पडली. सभेला नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, गटनेते सौरभ पाटील, गटनेते राजेंद्रसिंह यादव, हणमंतराव पवार, विनायक पावसकर, विजय वाटेगावकर, फारूक पटवेकर, स्मिता हुलवान, अंजली कुंभार, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या विशेष सभेसाठी एकूण दहा विषयांचा अजेंडा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामध्ये आगामी नगरपालिका निवडणुकीकरिता आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच लेखाशिर्षावरील निवडणूक खर्च या तरतुदीमधून खर्च करण्यास आर्थिक व प्रशासकीय मान्यता देणे, पालिकेच्या कायम आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांचे वेतन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा कऱ्हाड येथे पाठविणे व बँकेकडून ज्या कर्मचाऱ्यांनी कर्ज घेतले असेल, त्यांचे कर्जाचे हप्ते त्यांच्या वेतन बिलातून कपात करुन त्याचा धनादेश बँकेकडे पाठविण्याबाबत मंजुरी देणे, उपविभागीय अधिकारी, कऱ्हाड यांनी पालिकेच्या वर्ग ३ व वर्ग ४ मधील स्थायी रिक्त पदे, पदोन्नतीने भरण्याबाबत व ज्या कर्मचाऱ्यांची सेवा सलग १२ व २४ वर्षे पूर्ण झाली आहे, अशा कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे, पालिकेतील कर्मचारी सेवेत असताना मृत्यू पावल्याने त्यांच्या वारसाला अनुकंपा तत्त्वानुसार नोकरी मिळण्याबाबत केलेला अर्ज व त्यावर आलेला कार्यालयीन अहवाल यांचा विचार करणे, कऱ्हाड नगरपालिका कर्मचारी संघटना, कऱ्हाड यांच्या अर्जानुसार कर्मचाऱ्यांना दरमहाचे वेतन बिलातून देण्यात येणारा मेडिकल भत्ता बंद करुन शासनाच्या नियमानुसार वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती (मेडिक्लेम) लागू करण्याबाबत केलेली मागणी तसेच कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्याबाबत आलेल्या कार्यालयीन अहवालाचा विचार करणे, पार्ले येथील पालिकेच्या मालकीच्या कचरा डेपोसाठी असलेल्या जागेचा उद्देश बदलून पालिकेच्या फक्त शहर सफाई कर्मचाऱ्यांना जागा व त्यावर आवास योजनेंतर्गत घरे बांधून मिळण्याबाबतच्या अहवालाचा विचार करुन निर्णय घेण्यात आला. या १० विषयांना सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. मात्र, पार्ले येथील जागेवरून चांगलाच गदारोळ झाला.
चौकट
पार्लेतील अतिक्रमणे काढावीत
सौरभ पाटील म्हणाले, ‘नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना घरे मिळावीत. परंतु, परिपत्रकामध्ये घरांसाठी शासन पैसे देणार नाही. तेव्हा घरे कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार त्यांची यादी तयार करावी. त्यांची फसवणूक केली जाऊ नये.’
राजेंद्रसिंह यादव म्हणाले, ‘पार्ले येथील जागेवर अतिक्रमण केलेले आहे. ते अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. आपली जागा बंदिस्त करावी. सुरुवातीलाच नगरसेवकांनी विशेष सभा का बोलावली?’