‘संचार’ गावभर... ‘बंदी’ कागदावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:39 AM2021-04-16T04:39:06+5:302021-04-16T04:39:06+5:30
सातारा : जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा व त्याच्याशी निगडीत असलेले व्यवहार वगळता इतर सर्व व्यवहार दिनांक ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे ...
सातारा : जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा व त्याच्याशी निगडीत असलेले व्यवहार वगळता इतर सर्व व्यवहार दिनांक ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र, साताऱ्यात पहिल्याच दिवशी संचारबंदीच्या नियमांची पायमल्ली करण्यात आली. गुरुवारी अत्यावश्यक सेवेसह काही दुकाने उघडी ठेवण्यात आल्याने नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी घराबाहेर पडले. यात वाहनधारकांची संख्याही लक्षणीय होती. पोलीस प्रशासनाने कारवाई करूनही याचा फारसा उपयोग झाला नाही.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने पंधरा दिवस कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार केवळ अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडण्याचे आदेश नागरिकांना देण्यात आले आहेत. मात्र, असे असताना साताऱ्यात मात्र गुरुवारी याउलट चित्र दिसून आले. संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करत नागरिक व वाहनधारक मोठ्या संख्येने खरेदीसाठी घराबाहेर पडले. शहरातील किराणा दुकानांबाहेर खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावरच बस्तान बसवले होते. प्रामुख्याने बाजार समिती परिसर, बसस्थानक, जुना मोटर स्टँड व मंगळवार तळे मार्गावर भाजी विक्रेत्यांची संख्या अधिक होती. या भाजी विक्रेत्यांमुळेच बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळाली. काही विक्रेत्यांनी शासन आदेशाचे पालन करत पेठांमध्ये फिरून भाजी विक्री केली. तरीही नागरिकांकडून फिजिकल डिस्टन्सचे पालन केले गेले नाही. दुचाकीवरुन विनाकारण फिरणाऱ्यांची पोलीस प्रशासनाकडून तपासणी करण्यात आली. मात्र, अनेकांनी वैद्यकीय सेवेचे कारण पुढे केले. पहिला दिवस असल्याने पोलिसांनी अनेकांना समज दिली. मात्र, कोणावरही कठोर कारवाई केली नाही.
(चौकट)
दुकानदार, विक्रेत्यांना समज
मास्कचा वापर न करणाऱ्या व सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांना पालिका व पोलीस प्रशासनाकडून संचारबंदीच्या नियमांची आठवण करून देण्यात आली. फळ विक्रेत्यांना एकाच ठिकाणी उभे राहून व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असताना राजवाडा, खण आळी, तहसील कार्यालय, बसस्थानक परिसरात विक्रेते एकाच ठिकाणी व्यवसाय करत होते. अशा विक्रेत्यांना पोलिसांकडून तातडीने हटविण्यात आले.
(चौकट)
पोलिसांकडून वाहनांची तपासणी
अत्यावश्यक सेवा ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याने पोलीस दलाकडून शहरात ठिकठिकाणी तपासणी मोहीम राबविण्यात आली. तीनपेक्षा अधिक व्यक्ती असणाऱ्या चारचाकी वाहनांवर व दुचाकीवरून डबलसीट फिरणाऱ्यांचा पोलिसांकडून समाचार घेण्यात आला. यावेळी कारवाईच्या भीतीने काही दुचाकीस्वार पोलीस दिसताच यु-टर्न मारतानाही दिसून आले.
(चौकट)
पदार्थ गरम... प्रतिसाद नरम
हॉटेल व खाद्यपदार्थांच्या गाड्यांना पार्सल सेवा पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गुरुवारी शहरातील बहुतांश हॉटेल, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या सुरू होत्या; परंतु नेहमीप्रमाणे ग्राहकांची वर्दळ याठिकाणी पाहायला मिळाली नाही. ‘खाद्यपदार्थ गरम मात्र ग्राहकांचा प्रतिसाद नरम’ असे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले.
(कोट)
नागरिकांनी संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. केवळ अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडावे. जे दुकानदार व नागरिक शासन नियमांचे पालन करणार नाहीत, अशांवर पालिका प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल.
- माधवी कदम, नगराध्यक्ष
(कोट)
कोरोनाची साखळी तोडायची असेल तर आपल्याला नियमांचे पालन करायलाच हवे. शासनाने यासाठीच कठोर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे पुढील पंधरा दिवस कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. पालिकेकडून अत्यावश्यक सर्व बाबी पुरवल्या जातील.
- मनोज शेंडे, उपनगराध्यक्ष
फोटो : जावेद खान