बंदीतही वाहनधारकांचा संचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:24 AM2021-07-05T04:24:45+5:302021-07-05T04:24:45+5:30
सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील संचारबंदीचे निर्बंध पुन्हा एकदा कठोर करण्यात आले आहेत. असे असले, तरी अत्यावश्यक सेवेच्या ...
सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील संचारबंदीचे निर्बंध पुन्हा एकदा कठोर करण्यात आले आहेत. असे असले, तरी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होईना. सातारा शहरात रविवारी दिवसभर पोलीस दलाकडून वाहनधारकांची कसून चौकशी करण्यात आली, तसेच अनेकांकडून दंडही वसूल करण्यात आला.
जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याचे वाढली, शिवाय कोरोनामुळे मृत्युमुुखी पडणाऱ्यांची संख्याही मोठी होती. जून महिना सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात रुग्ण संख्या अटोक्यात आली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून संचारबंदीचे निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आले. मात्र, पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढू लागल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत संचारंबदीचे निर्बंध कठोर केले आहेत. सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा वेळेचे बंधन घालून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर शनिवार व रविवार पूर्ण संचारबंदी असणार आहे. असे असले, तरी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली वाहनधारक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत.
संचारबंदी असतानाही सातारा शहरात रविवारी वाहनधारक गर्दी दिसून आली. पोलीस दलाकडून ठिकठिकाणी वाहनधारकांची कसून चौकशी करण्यात आली, तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकीकडे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय राबविले जात आहेत. मात्र, वाहनधारक व नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याने कोरोनाची साखळी तुटण्याचे नाव घेईना. त्यामुळे वारंवार लागू होत असलेल्या संचारबंदीची व्यापारी, विक्रेते व सर्वसामान्य नागरिकांना मोठी झळ सोसावी लागत आहे.
(चौकट)
आम्ही जगायचं कसं
संचारंबदी असतानाही रविवारी अनेक भाजी व फळ विक्रेत्यांनी शहरात हजेरी लावली. काही भाजी विक्रेत्यांना ग्राहकांची दिवसभर प्रतीक्षा करावी लागली. बस स्थानक परिसरातील भाजी विक्रेत्यांना संचारबंदीबाबत विचारले असता, ‘सततच्या संचारबंदीमुळे आमचं जगणं मुश्कील झालं आहे. भाजी विक्रीवरच आमच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे. व्यवसाय एक दिवस बंद ठेवाल, तरी आर्थिक संकट उभे राहते. आम्ही जगायचं तरी कसं,’ अशा भावना त्यांनी ‘लोकमत’पुढे व्यक्त केल्या.