रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता ‘उमेद’ने करुन दाखवले, साताऱ्यातील ९ लाख नागरिकांशी साधला संवाद
By नितीन काळेल | Published: May 8, 2024 06:47 PM2024-05-08T18:47:11+5:302024-05-08T18:47:39+5:30
पथकांनी घराबाहेर पडून केले प्रोत्साहित
सातारा : रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत पथकांनी घराबाहेर पडून लोकांना मतदानासाठी प्रोत्साहित केले. ९ लाख नागरिकांशी संवाद साधला. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढीस हातभार लागला. यामुळे ‘उमेद’ टीमचे काैतुक होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि स्वीप कक्षाच्या जिल्हा नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह जिल्हा प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढीसाठी विविध पातळीवर प्रयत्न केले. यासाठी उपक्रम राबवून मतदारांत जनजागृती करण्यात आली. याचा फायदा या निवडणुकीत दिसून आला. तसेच या मतदानवाढीसाठी ‘उमेद’मधील महिलांनीही मोठी कामगिरी बजावलीय.
जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता उमेद अंतर्गत कार्यरत टीमने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कारण ‘उमेद’मध्ये कार्यरत प्रेरिकांनी गृहभेटी, प्रत्यक्ष पात्र मतदारांची भेट घेऊन मतदान करण्यास प्रोत्साहित केले. यामुळेच गतवर्षीपेक्षा उन्हाची तीव्रता अधिक असतानाही मतदानाचा टक्का वाढविण्यास हातभार लागला. मागील निवडणुकीत ६० टक्क्यांहून अधिक मतदान सातारा लोकसभेसाठी झाले होते. यंदा हेच मतदान ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. यामध्ये अंतिम टक्केवारीत वाढ होणार आहे. त्यामुळे मागील निवडणुकीपेक्षा आता मतदान अधिक झाल्याचेच स्पष्ट झाले आहे. यासाठी स्वीप कक्षाच्या नोडल अधिकारी याशनी नागराजन आणि ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे यांचे प्रयत्नही कारणीभूत ठरले आहेत.
१० हजार महिलांशी संवाद..
मतदान टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणात राबविले. यामध्ये दुचाकी रॅली, चित्र प्रदर्शन, गृह भेटीद्वारे पत्रक वाटप करण्यात आले. त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी समाजमाध्यमाद्वारे ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत सुमारे १० हजार महिलांशी संवाद साधत मतदान वाढवण्यासाठी कशा पद्धतीने कार्यवाही करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील सुमारे १५ हजार १८७ बचत समूह, ९६७ ग्रामसंघ आणि ५१ प्रभागसंघाच्या बैठका घेऊन सुमारे १७ हजार समुदाय संस्थांचे सदस्य आणि पदाधिकारी कंबर कसून मतदार जनजागृतीसाठी मैदानात उतरले होते.
मतदान राहिले त्यांना नेले केंद्रावर..
‘उमेद’ टीमने रखरखत्या उन्हाची कसलीही पर्वा न करता ग्रामीण भागातील प्रत्येक घरी जाऊन सुमारे ९ लाख नागरिकांचे मतदानाविषयी समुपदेशन केले. याशिवाय मतदानादिवशीही आपली जबाबदारी १०० टक्के बजावताना वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक व्यक्ती केंद्रापर्यंत जाऊन प्रत्यक्ष मतदान कसे करेल यासाठी नियोजन केले. कोणाचे मतदान झाले, कोणाचे बाकी आहे याची माहिती घेतली. त्यानंतर मतदान राहिले आहे त्यांना केंद्रापर्यंत पोहोचवण्याचे काम केले.