मानवता धर्मामुळेच समाजात एकोपा:पुनियानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:39 AM2018-11-21T00:39:18+5:302018-11-21T00:39:22+5:30
सातारा : ‘भारत विविधतेने नटलेला देश असून, धर्मनिरपेक्ष असल्यानेच मजबूत आहे; पण आज राजकारणासाठी दंगली घडविण्यात येतात, द्वेष पसरविला ...
सातारा : ‘भारत विविधतेने नटलेला देश असून, धर्मनिरपेक्ष असल्यानेच मजबूत आहे; पण आज राजकारणासाठी दंगली घडविण्यात येतात, द्वेष पसरविला जातो. अशावेळी संत, महामानवांचा मानवता धर्मच सर्वांत एकोपा ठेवत आहे. त्यामुळे आपणा सर्वांना मानवता धर्मानेच पुढे जायचे आहे, हे लक्षात ठेवावे,’ असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. राम पुनियानी यांनी केले.
येथील गांधी मैदानावर मुस्लीम जागृती अभियान आणि परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या वतीने सर्वधर्म भाईचारा सभा झाली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. पुनियानी बोलत होते. या कार्यक्रमाला संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सुहास फडतरे, साताऱ्यातील शाही मस्जिदचे इमाम हाफिज खलील अहमद, टिळक मेमोरियल चर्चचे डॉ. डॅनियल गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे विद्याधर गायकवाड, लिंगायत समितीचे सागर कस्तुरे, महानुभव पंथाचे राजकुमार बीडकर आदी उपस्थित होते.
डॉ. पुनियानी म्हणाले, ‘जगात इस्लाम धर्माला दहशतवादाशी जोडले जात आहे, हे चुकीचे आहे. संतांनी धर्माला प्रेमात पाहिले. धर्म हा जगाला प्रेम शिकवतो, द्वेष नाही. सर्वांनी प्रेमाने राहावे, हे मानवता धर्मच शिकवतो.’
डॉ. फडतरे म्हणाले, ‘मुहम्मद पैगंबर यांनी आपण सर्वजण एकच आहोत, हे जगाला प्रथम सांगितले. मानवता धर्माची प्रेरणा मुहम्मद पैगंबर यांनीच सर्वांना दिली आहे. माणूस बनण्यासाठी संत आणि महामानवांची विचारधारा अंगीकार करणे आवश्यक आहे.’
हाफिज खलील अहमद यांनी एका मानसाने दुसºयाचा आदर करावा. कोणताही धर्म खोटे बोला, चोरी करा, द्वेष करा, असे सांगत नाही तर प्रेम करा, असेच सांगतो, असे सांगितले.
या कार्यक्रमाचे विजय मांडके यांनी सूत्रसंचालन केले. रफिक शेख यांनी आभार मानले.