‘मोदी सरकार’च्या नावावर कंपनीचा भूलभुलैया !
By admin | Published: February 26, 2015 09:38 PM2015-02-26T21:38:24+5:302015-02-27T00:19:51+5:30
उत्तर कोरेगावात फसव्या योजना : मार्केटिंगच्या नावाखाली अनेकांना लाखोंचा गंडा; ग्रामस्थ हतबल
पिंपोडे बुद्रुक : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता मग ती अशिक्षित असो अथवा सुशिक्षित. कोणत्या ना कोणत्या आमिषाला बळी पडत असते. सध्या उत्तर कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुकसह परिसरात पुण्यातील एका कंपनीच्या नावाने गृहोपयोगी वस्तूंची विक्री करून जनतेला दिवसा ढवळ्या फसविले जात आहे. गेल्या पंधरा दिवसांत परिसरातून हजारो रुपये उकळून टोळी पसार झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, आपले हसू होईल, या भीतीने कुणीही तक्रार करीत नाही.याबाबतचे वृत्त असे की, पुणे येथील एका फर्मच्या नावाने पावती पुस्तके छापून काही तरुण, तरुणी ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात दुपारच्यावेळी फिरून वस्तूंची विक्री करीत आहेत. त्यामध्ये प्रेशर कुकर, तवा, कढई, स्टील पातेली, चांदीचे पॉलिश असलेले ग्लास, वीज बचतीसाठी पॉवर सेव्हर मशीन अशा प्रकारच्या वस्तूंचा समावेश असून, या वस्तूंची एकूण किमती पैकी काही रक्कम अॅडव्हान्स घेऊन त्या वस्तू तुम्ही सांगितलेल्या दिवशी तुम्हाला घरपोच करण्याचे आश्वासन दिले गेले. याशिवाय वस्तू खरेदी केल्यावर तुम्हाला एका कंपनीचा ३२ इंची टीव्ही भेट मिळणार आहे, त्यासाठी फक्त एक हजार रुपये भाडेखर्च द्यावा लागेल, असे सांगितले जात आहे. याचबरोबर जर आपण आणखी तीन सभासद ग्राहक दिले तर आपणास किमान दहा हजार रुपये किमतीची वस्तू मोफत दिली जाईल, त्यासाठी तुमच्या आवडीच्या वस्तू तुम्ही सुचवा असे प्रलोभन दाखविले जात आहे.लहान मुलांच्या नावाने खरेदी करा आम्ही पुढील दहा वर्षे प्रतिवर्षी एक भेटवस्तू त्या मुलास देणार असल्याचे फसवे आश्वासन दिले जात असून, यासाठी जनता मुख्यत्वे महिला या गोष्टींना लेगचच फसत असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)
- राज्य सरकार अथवा केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना आणलेली नाही, त्यामुळे जनतेने या गोष्टींना बळी पडू नये तसेच यापुढील काळात जर कोणी अशा वस्तू विकताना नजरेस आला तर स्थानिक पोलिसांशी अथवा आमच्याशी संपर्क साधावा
- दीपक पिसाळ, तालुकाध्यक्ष, भाजपा कोरेगाव
संबंधित कंपनीचा पत्ताही फसवा...
पिंपोडे येथील काही ग्रामस्थांना संबंधितांच्या वतीने देण्यात आलेल्या पावतीवरील पत्ता फसवा असून, या पत्त्यावर पिंपोडेतील एका युवकाने चौकशी केली असता अशी कोणतीही कंपनी अस्तित्वात नसल्याचे आढळून आले आहे.
पावतीवर छापण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकापैकी दोन मोबाईल क्रमांक अस्तित्वात नसल्याचे अथवा संपर्कहीन असल्याचे काही ग्रामस्थांना दिसून आले. आहे तसेच संबंधित पावतीवर देण्यात आलेला एक क्रमांक हा सोलापूर येथील युवकाचा असून संबंधित युवक एका महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. यावरूनच या योजनेचे सत्य समोर आले आहे.
म्हणे, मोदी सरकारची योजना
सर्वसामान्य जनतेला या वस्तू कमीत कमी किमतीत उपलब्ध व्हाव्यात, तसेच त्याचा वापर करता यावा, या देऊन मोदी सरकारने ही योजना सुरू केली असून, आमच्या कंपनीला या वस्तू विकण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे विक्री प्रतिनिधी ग्राहकाना ठासून सांगत आहेत. त्यामुळे ग्राहकांचा पटकन् विश्वासही बसत आहे.
सुशिक्षित तरुण अन् तरुणी
मार्केटिंग करणारे प्रतिनिधी उच्चशिक्षित आहेत. त्यांचे उच्च दर्जाचे राहणीमान व बोलण्यातील माधुर्यामुळे ग्राहक त्यांच्या पटकन जाळ्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. दुपारच्या वेळी वयोवृद्ध व महिला घरी असल्यामुळे त्यांना फसविणे अधिक सोपे जात आहे.