अनुकंपाधारकांना तारीख पे तारीख ! आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 07:01 PM2020-02-26T19:01:23+5:302020-02-26T19:05:40+5:30
पाच उमेदवारांनी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिली होती. आता त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. असे असतानाच अजूनही कोणाला नियुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे इच्छुकांत नाराजीचे वातावरण आहे.
सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील अनुकंपाधारकांची नोकर भरतीची प्रक्रिया संभाव्य यादी जाहीर होऊनही रखडली आहे. त्यासाठी तारीख पे तारीख मिळत असल्यामुळे अनुकंपाधारकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालीय. आता १६ मार्चपर्यंत नियुक्ती न मिळाल्यास सर्वसाधारण सभेवेळी आंदोलन करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सदस्यानेच घेतला आहे.
राज्य सरकारी कर्मचारी सेवेत असताना दिवंगत झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना साहाय्य व्हावे, त्यांना आर्थिक मदत मिळावी, या अनुषंगाने वारसांना अनुकंपा नियुक्ती देण्याचे शासनाचे धोरण आहे. या निर्णयानुसार सातारा जिल्हा परिषदेत भरती करण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) मनोज जाधव यांनी गेल्या दहा वर्षांचा प्रयत्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यातूनच ८० जणांची यादी जानेवारी महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर कागदपत्रे मागवून घेऊन पडताळणी करण्यात आली. तेव्हा त्यातील पाच उमेदवारांनी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिली होती. आता त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. असे असतानाच अजूनही कोणाला नियुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे इच्छुकांत नाराजीचे वातावरण आहे. परिणामी अनुकंपाधारक यादीतील उमेदवारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
१७ मार्चला जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा होत आहे. त्यापूर्वी अनुकंपाधारकांना नियुक्ती द्यावी, यासाठी उमेदवार आग्रही आहेत. नाहीतर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा १७ मार्च रोजी होणार आहे. या सभेपूर्वी अनुकंपाधारक उमेदवारांना नियुक्ती आदेश द्यावा, अशी आमची विनंती आहे. तसे न झाल्यास १७ मार्चला सर्व अनुकंपा उमेदवारांना बरोबर घेऊन प्रशासनाविरोधात सभेतच तीव्र आंदोलन करणार आहे.
- बापूराव जाधव, सदस्य, जिल्हा परिषद