अतिवृष्टीतील नुकसानभरपाई मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:49 AM2021-07-07T04:49:14+5:302021-07-07T04:49:14+5:30
सातारा : जिल्ह्याच्या काही भागांत मान्सूनपूर्व पावसात अतिवृष्टी झाली होती. त्यात नुकसानग्रस्त शेतीसह विहीर व घरांचे पंचनामे करण्यात आले ...
सातारा : जिल्ह्याच्या काही भागांत मान्सूनपूर्व पावसात अतिवृष्टी झाली होती. त्यात नुकसानग्रस्त शेतीसह विहीर व घरांचे पंचनामे करण्यात आले होते. त्याची नुकसानभरपाई त्वरित मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने वेळेत भरपाई मिळाली तर त्याचा बळीराजाला आधार होणार आहे. त्यामुळे अतिवृष्टीतील नुकसानभरपाई लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी होत आहे.
कोविड नियमांचे पालन आवश्यक
सातारा : वाढत्या कोविड प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या जिल्हा पुन्हा लॉक झाला असून, संसर्ग साखळी तोडण्यासाठी करण्यात आलेल्या शासनाच्या सूचनांकडे गावकऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बाधित रुग्ण शहरी भागाच्या तुलनेत जास्त वाढत आहेत.
ओढा स्वच्छतेची मागणी
सातारा : येथील विसावा नाका परिसरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. या परिसरातील ओढ्याची स्वच्छता करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. नेहमी वर्दळीच्या असलेल्या या रस्त्यावरील कचरा उचलण्याची गरज आहे. कचरा साचत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. झाडाच्या फांद्या, प्लास्टिक व कचरा सिमेंट पाइपमध्ये अडकून ओढा तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने ओढ्याची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
फांद्यांनी फुटपाथ झाकोळला
सातारा : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय रस्त्यावर असलेल्या पदपथावर लावण्यात आलेल्या झाडांच्या फांद्या तातडीने तोडण्याची मागणी होत आहे. संबंधित फांद्या अपघाताला निमंत्रण देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाहतुकीला धोकादायक ठरणाऱ्या या फांद्या काढण्याची मागणी होत आहे.
कर्मचाऱ्यांना संरक्षण द्या
सातारा : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे प्राधान्याने लसीकरण कररण्यात यावे. लसीकरणाचे काम करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे, अशी मागणी आरोग्य सेवा कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी अध्यक्ष तुषार निकम, कार्याध्यक्ष शहनाज शेख, सुनील खामकर, सुनील भोसले आदी उपस्थित होते.