कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टरांविरोधात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:29 AM2021-06-01T04:29:29+5:302021-06-01T04:29:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : साताऱ्यातील कस्तुरबा रुग्णालयात लसीकरणावरून झालेल्या वादावादीनंतर सातारा पालिकेच्या नगरसेविकेसह त्यांच्या पतीवर रविवारी गुन्हा दाखल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : साताऱ्यातील कस्तुरबा रुग्णालयात लसीकरणावरून झालेल्या वादावादीनंतर सातारा पालिकेच्या नगरसेविकेसह त्यांच्या पतीवर रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता या रुग्णालयातील एका डॉक्टराच्या मनमानीने त्रस्त झालेल्या आरोग्यसेवकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देऊन त्यांच्या बदलीची मागणी केली आहे.
कस्तुरबा रुग्णालय सातारा पालिकेकडून चालविले जाते. या रुग्णालयात जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा नियुक्त आहे. त्यामध्ये एका खाजगी डॉक्टरांना येथे दोन तासांची सेवा बजाविण्याचे आदेश देण्यात आले आहे. संबंधित डॉक्टरच्या कार्यपद्धतीबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य केंद्रावर आपल्या ओपीडीच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करणे, ओळखीचे नागरिक किंवा हितचिंतकांचे जबरदस्तीने लसीकरण करविणे, काहींची नावे टोकनच्या यादीत टाकणे अशा प्रकारांबाबत आरोग्यसेवकांनी आक्षेप घेतले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी तक्रारीच्या भानगडीत न पडता रुग्णालयातील लसीकरणाला प्राधान्य दिले. मात्र, हस्तक्षेप वाढू लागल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी संबंधित डॉक्टरांच्या तक्रारीचे निवेदन थेट शाहूपुरी पोलीस ठाण्याला दिले. संबंधित डॉक्टरांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
(चौकट)
उदयनराजेंकडून दखल
कस्तुरबा रुग्णालयात दादागिरी केल्याप्रकरणी नगरसेविका स्मिता घोडके व त्यांचे पती चंद्रशेखर घोडके यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाची खासदार उदयनराजे भोसले यांनी दखल घेत मुख्याधिकारी अभिजित बापट यांना या प्रकरणात लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. उदयनराजे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणाचा पूर्ण तपास करून मगच कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.