एसपींच्या विरोधात विधानसभेत तक्रार, राजशिष्टाचार पाळत नसल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 03:15 PM2019-12-23T15:15:48+5:302019-12-23T15:18:53+5:30
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व त्यांच्या सर्व पोलीस यंत्रणेकडून लोकप्रतिनिधींचा सन्मान व राजशिष्टाचार जाणिवपूर्वक पाळला जात नाही, अशी तक्रार जिल्ह्यातील आमदारांनी विधानसभेत केली आहे.
सातारा : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व त्यांच्या सर्व पोलीस यंत्रणेकडून लोकप्रतिनिधींचा सन्मान व राजशिष्टाचार जाणिवपूर्वक पाळला जात नाही, अशी तक्रार जिल्ह्यातील आमदारांनी विधानसभेत केली आहे.
या तक्रारीची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. अधिवेशनात शनिवारी शेवटच्या दिवशी पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी ही बाब राज्य शासनाच्या व विधीमंडळ सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी जिल्ह्यातील आमदारांनी यासंदर्भातील तक्रार सभागृहात करून आमदार शंभूराज देसाई यांनी मांडलेल्या मुद्द्याला समर्थन दिले.
आमदार शंभूराज देसाई म्हणाले, साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक यांची वर्तणूक आणि वागणूक ही लोकप्रतिनिधींना असौजन्याची आहे. तसेच जिल्हा पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ, कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्याकडूनही लोकप्रतिनिधींशी सौजन्याच्या वागणुकीसंदर्भात शासन आदेशांचे पालन केले जात नाही.
मी स्वत: एकदा नव्हे तर चार-चारदा जिल्हा पोलीस अधीक्षकांना सर्व शासन निर्णय जोडून पत्रव्यवहार केला आहे. यातील एकाही पत्राचे उत्तर देण्याची त्यांनी तसदी घेतली नाही. तसेच फोनवर माहिती विचारली तर त्यांना ती देताही येत नाही.