Satara: शिक्षकांकडे तक्रार केली, शालेय मुलाचा शाळेतील मुलांवरच जीवघेणा हल्ला; दोघे जखमी, शिरवळ येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 11:15 AM2023-07-15T11:15:50+5:302023-07-15T11:16:11+5:30

नागरिकांच्या सतर्कतेमुळे संबंधित शालेय विद्यार्थ्याचा जीव वाचला

Complaint to teachers, school boy fatal attack on school children; Two injured, incident at Shirwal | Satara: शिक्षकांकडे तक्रार केली, शालेय मुलाचा शाळेतील मुलांवरच जीवघेणा हल्ला; दोघे जखमी, शिरवळ येथील घटना

Satara: शिक्षकांकडे तक्रार केली, शालेय मुलाचा शाळेतील मुलांवरच जीवघेणा हल्ला; दोघे जखमी, शिरवळ येथील घटना

googlenewsNext

मुराद पटेल

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावच्या हद्दीत शाळेत शिक्षकांकडे तक्रार केल्याच्या कारणातून शालेय विद्यार्थ्याने शाळेमधील दोन विद्यार्थ्यांवर लोखंडी घातक शस्त्राने जीवघेणा हल्ला करीत गंभीर जखमी केले आहे. दरम्यान, जीवघेणा हल्ला करणाऱ्या शालेय अल्पवयीन विद्यार्थ्याला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली. शिरवळमधील नागरिकांच्या सतर्कतेमुळे संबंधित शालेय विद्यार्थ्याचा जीव वाचला. तर हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याने घटनास्थळावरून पलायन केले.

याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिरवळ परिसरात एका खाजगी शाळेमध्ये दोन भाऊ शिकतात. एक दहावीत तर दुसरा आठवीमध्ये आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी शाळेमध्ये नव्याने दाखल झालेला पंधरा वर्षीय विद्यार्थी हा नाहक त्रास देत असल्याची तक्रार संबंधित अल्पवयीन विद्यार्थ्यांनी शाळेमधील शिक्षकांकडे केली होती. त्यानुसार शाळेमधील शिक्षकांनी पंधरा वर्षीय विद्यार्थ्याला समज दिल्याने संबंधित पंधरा वर्षीय विद्यार्थी दोन्ही भावंडांवर चिडून होता.

शुक्रवार दि. १४ जुलै रोजी शाळा सुटल्यानंतर पंधरा वर्षीय विद्यार्थ्याने घरी निघालेल्या दोन्ही भावांना शिरवळमधील एका शाळेलगत असणाऱ्या चौकामध्ये अडवित अचानकपणे लोखंडी घातक शस्त्राने जोरदार हल्ला केला. यावेळी सतरा वर्षीय विद्यार्थी गंभीर तर भावाला वाचविताना चौदा वर्षीय भाऊ हा गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चौदा वर्षीय विद्यार्थ्याला अधिक उपचाराकरिता पुणे याठिकाणी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. यावेळी शिरवळ पोलिसांनी तपासचक्र फिरवित हल्लेखोर पंधरा वर्षीय विद्यार्थ्याला अवघ्या वीस मिनिटांमध्ये ताब्यात घेतले. पोलिस जितेंद्र शिंदे यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. घटनेची नोंद करण्याचे काम शिरवळ पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

शिरवळकरांची सतर्कता.. दोघांचा जीव वाचला

शिरवळ येथे भर चौकात विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांवर घातक शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. त्यामुळे घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. तिथे उपस्थित नागरिकांनी सतर्कता दाखवत हल्लेखोर विद्यार्थ्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याने घटनास्थळावरून पलायन केले. नागरिकांच्या या सतर्कतेमुळे दोन्ही विद्यार्थ्यांचा जीव वाचला.

Web Title: Complaint to teachers, school boy fatal attack on school children; Two injured, incident at Shirwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.