श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:58 AM2021-02-23T04:58:17+5:302021-02-23T04:58:17+5:30

रहिमतपूर : जलसंवर्धनासाठी रहिमतपूर नगर परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदानातून कापूर ओढ्यावर एका दिवसात वनराई बंधारा बांधण्याचे ...

Completion of Vanrai dam work through hard work | श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास

श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास

Next

रहिमतपूर : जलसंवर्धनासाठी रहिमतपूर नगर परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदानातून कापूर ओढ्यावर एका दिवसात वनराई बंधारा बांधण्याचे काम पूर्णत्वास नेले. या बंधाऱ्यामुळे मुबलक पाणीसाठा झाला आहे.

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत जलसंवर्धनासाठी वनराई बंधारे श्रमदानाच्या माध्यमातून बांधण्याच्या उपक्रमाला कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर पालिकेच्या वतीने रविवारपासून प्रारंभ करण्यात आला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली सकाळी श्रमदानातून बंधारा बांधण्यासाठी रहिमतपुरातील नागरिकांचा ताफा कापूर ओढ्याच्या दिशेने मार्गस्थ झाला.

यामध्ये नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपाध्यक्ष सुरेखा माने, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, अविनाश माने, नगरसेवक विद्याधर बाजारे, शशिकांत भोसले, रमेश माने, शिवराज माने, विक्रम माने, नीता माने, माधुरी भोसले, पोलीसपाटील दीपक नाईक, तानाजी राऊत, राजेंद्र शिंदे, कृषी सहायक राजेंद्र जंगम, राजेंद्र पवार, मानसिंग पवार यांचा समावेश होता.

कापूर ओढ्यामध्ये सोळा मीटर लांबीचा, एक मीटर रुंदी आणि अडीच मीटर खोलीचा वनराई बंधारा श्रमदानातून बांधण्यास सुरुवात करण्यात आली. यासाठी खडी, दगडी गोटे व माती मिक्स असलेल्या प्लॅस्टिकच्या गोण्या भरण्यात नगरसेविका हिरहिरीने सहभागी झाल्या होत्या. भरलेल्या गोण्या व्यवस्थित लावण्याचं काम पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले. त्यामुळे काही तासांतच श्रमदानाच्या माध्यमातून कापूर ओढ्यावर बंधाऱ्याचे काम पूर्णत्वाला गेले. घाम गाळून बांधलेल्या बंधाऱ्यामुळे मुबलक पाणी साठल्याचे पाहून उपस्थितांच्या गालावर हसू खुलले होते.

चौकट :

बंधाऱ्यामुळे पाणी पातळी वाढणार

वनराई बंधाऱ्यांमुळे ओढ्यांतून खळखळून निघून जाणाऱ्या पाण्याला अटकाव बसला आणि मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक झाली आहे. या पाण्याचा फुगवटा दूरपर्यंत गेला आहे. त्यामुळे परिसरातील विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत निश्चितपणे वाढ होईल. अनेक ओढ्यावर लोकसहभाग घेऊन श्रमदानाच्या माध्यमातून वनराई बंधारे बांधणार असल्याचे सुनील माने यांनी स्पष्ट केले.

फोटो : २२रहिमतपूर-बंधारा

रहिमतपूर येथे श्रमदानाच्या माध्यमातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. (छाया : जयदीप जाधव)

Web Title: Completion of Vanrai dam work through hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.