संगणक परिचालक संघटना अध्यक्षांची प्रकृती खालावली, सातारा जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरुच
By नितीन काळेल | Published: January 23, 2024 07:22 PM2024-01-23T19:22:16+5:302024-01-23T19:22:34+5:30
सातारा जिल्हा परिषदेसमोर राज्यव्यापी आंदोलन, आठ दिवसानंतरही मागण्यांवर निर्णय नाही
सातारा : मानधन नको, वेतन द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी सातारा जिल्हा परिषदेसमोर राज्यव्यापी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला आठ दिवस होऊनही मागण्यांबाबत निर्णय झालेला नाही. तर राज्यध्यक्षा सुनीता आमटे यांचे उपोषण सुरूच आहे. त्यांची प्रकृती खालावू लागली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. यामध्ये शेकडो संगणक परिचालक सहभागी झाले आहेत. यावलकर समितीच्या शिफारशीनुसार सुधारित आकृतीबंध घेऊन किमान वेतन द्यावे, शासनाने कंपनीला ठरवून दिलेल्या नियमावलीप्रमाणे कुशल कामगार वेतन ( २२ हजार ६००) इतके मानधन देण्यात यावे, कंपनीने लावलेली बोगस हजेरी आणि इन्व्हाईस तत्काळ बंद करावा. कंपनीने विनाकारण लावलेले उद्दिष्ट बंद करण्यात यावे, आतापर्यंतचा हक्काचा पीएफ, भविष्य निर्वाह निधी खात्यात त्वरित जमा करण्याचे आदेश द्यावेत, २०११ ला संगणक आणि प्रिंटर दिले असून ते नादुरुस्त आहेत. हे सर्व नवीन देण्यात यावेत. मानधन प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखेलाच मिळावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.
दि. १६ जानेवारीपासून हे आंदोलन सुरू आहे. तरीही शासनस्तरावर मागण्यांबाबत काहीही निर्णय झालेला नाही. तसेच अधिकाऱ्यांकडूनही काहीही सकारात्मक पावले उचलण्यात आलेली नाहीत. आतापर्यंत विविध राजकीय संघटना, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनीही या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. तर संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुनीता आमटे यांचे आठ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती खालावू लागली आहे. वैद्यकीय अधिकारी प्रकृतीची तपासणी करत आहेत. सध्या त्या उपोषणस्थळीच आहेत.