पोवईनाक्यावर फ्लायओव्हरची संकल्पना
By admin | Published: February 13, 2015 10:02 PM2015-02-13T22:02:13+5:302015-02-13T22:54:47+5:30
सातारा शहराचं नवं रूप : संकल्पचित्र आज जाणार बांधकाम मंत्र्यांच्या भेटीला
सातारा : पोवई नाका परिसराचे योग्य नियोजन नाही. त्यामुळे सध्या त्या ठिकाणी जागा मोठी असूनही वाहतुकीच्या अनेक समस्या उद्भवत असल्याचे दिसते. या समस्यांचा उपाय म्हणून येथील आर्किटेक्ट नरेंद्र रोकडे यांनी एक संकल्पचित्र तयार केले आहे. हे संकल्पचित्र सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना शनिवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी दाखविले जाणार आहे.
शहराचा विकास ज्या झपाट्याने झाला, त्या झपाट्याने पोवई नाका परिसराचा कायापालट झाला नाही. आठ रस्ते एकत्र येत असलेला शहरातील हा सर्वात मोठा नाका सध्या अपघातांचे केंद्र बनू लागला आहे. शाळा, बँक, हॉटेल महत्त्वाची आर्थिक संस्था हे सर्वच पोवई नाक्यावर असल्याने येथे दिवसभर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. कामांच्या आणि घाईच्या वेळी तर अलीकडे हमखास ट्रॅफिक जाम होण्याचे प्रमाण आता चांगलेच वाढले आहे. कित्येकदा शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेत झालेल्या अपघातात काहीना मृत्युमुखीही पडावे लागले आहे.
पोवई नाका परिसराच्या संकल्प चित्रात कर्मशियल कॉम्प्लेक्स, पार्किंग आणि उड्डाण पुलाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्वांवर आकर्षक बाग तयार करून हिरवळ निर्माण करण्याचेही संकल्प आहे. कर्मशियल कॉम्प्लेक्समध्ये पुणे येथील तुळशीबागेच्या धर्तीवर काही दुकाने थाटण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. त्याबरोबरच या परिसरातील सर्व वाहनांसाठी वाहनतळही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पोवई नाक्याचे हे संकल्पचित्र सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर नरेंद्र रोकडे व महेंद्र चव्हाण घेऊन जाणार आहेत. याविषयी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन सातारकरांची स्वप्नपूर्ती करण्याची मागणीही या निमित्ताने होत आहे. (प्रतिनिधी)
पोवई नाका परिसरात खूप मोठी जागा आहे. या जागेचे योग्य नियोजन केले तर सातारकरांना महानगरांच्या धर्तीवर काही चांगले प्रयोग येथे करता येतील.
- नरेंद्र रोकडे,
संकल्प चित्रकार
वाहतुकीची कोंडी फुटू शकते !
कोल्हापूरला जाणारी वाहने थेट उड्डाणपुलावरून जातील
अपघातांचे प्रमाण कमी होईल
एकेरी वाहतुकीचे नियोजन केल्यामुळे वेगाने वाहतूक होईल
सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची आवश्यकता नाही
मुख्य ठिकाणी बाग उभारल्याने सुशोभीकरण