कोविड रुग्णांच्या चिंतेने आप्तस्वकीयांची रात्र कधी व्हरांड्यात तर कधी झाडाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:35 AM2021-04-19T04:35:52+5:302021-04-19T04:35:52+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असून, सर्वच रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. कुटुंबातील एक व्यक्ती बाधित ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असून, सर्वच रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. कुटुंबातील एक व्यक्ती बाधित आल्यानंतर त्या व्यक्तीसोबत कुटुंबातील तीन ते चारजण रुग्णालयात येत आहेत. आतमध्ये रुग्णांवर उपचार सुरू असताना बाहेर मात्र नातेवाईक रात्रं-दिवस कधी व्हरांड्यात तर कधी झाडाखाली आसरा घेऊन दिवस कंठत आहेत.
तसं पाहिलं तर नातेवाईकांना बाधितांसोबत राहता येत नाही, हे माहीत असूनही अनेकजण काळजीपोटी रुग्णालयाबाहेर थांबणे पसंत करतात. पण घरी जात नाहीत. त्यातच अधेमधे वाॅर्डबाॅयला आपल्या रुग्णाची तब्बेत कशी आहे, हे विचारून पुन्हा नातेवाईक बाहेर येतात. नातेवाईकांची चोवीस तास घालमेल हाेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
- गेल्या चार दिवसांपासून मी सिव्हीलसमोर मुक्काम केला आहे. माझी आजी कोरोनाबाधित आहे. वाॅर्डमध्ये आम्हाला सोडलं जात नाही. पण चुकून काही त्यांना हवं असलं तर आजीला कोण देणार, म्हणून मी बाहेर थांबलोय. घरी जाऊन काय करणार.
- दीपक माने, सातारा.
- दोन दिवस झाले माझ्या वडिलांना सिव्हीलमध्ये दाखल केले आहे. त्यांना धाप लागत होती, पण आता चांगले आहेत. आम्हाला घरी जा, असं सांगितलं आहे. पण वडिलांच्या काळजीपोटी घरी जावेसे वाटत नाही. त्यामुळे रात्रभर मी इथेच थांबतो.
- सतीश काळे, फलटण
- सिव्हीलमध्ये रुग्णांना चांगली सेवा दिली जात आहे. माझ्या भावाला दोन दिवसांपूर्वी प्रचंड धाप लागली होती. आता ही धाप कमी आली आहे. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे इथं थांबलो आहोत. जोपर्यंत माझा भाऊ बरा होत नाही, तोपर्यंत इथून आम्ही घरी जाणार नाही.
- रामचंद्र पाटील, कोरेगाव
-
नातेवाईकांकडे जाता येत नाही ....
कोरोना वाॅर्डमध्ये खरंतर नातेवाईकांना आतमध्ये साेडले जात नाही. तरीसुद्धा नातेवाईक रात्रभर सिव्हीलच्या बाहेर झोपतात. पुन्हा सकाळी वाॅर्डच्या बाहेर काळजीने घुटमळत असतात. केवळ आपल्या आप्तस्वकीयांच्या काळजीपोटी नातेवाईक हालअपेष्टा सहन करत असल्याचे दिसून येत आहे.