शैक्षणिक फी बाबत सवलतीचा तातडीने निर्णय घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:49 AM2021-06-16T04:49:52+5:302021-06-16T04:49:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणसंस्थांचे पैसे वाचले असतानाही या संस्था फी साठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणसंस्थांचे पैसे वाचले असतानाही या संस्था फी साठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहेत. याप्रश्नी आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सागर भोगांवकर यांनी शिक्षण मंत्र्यांना शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, २०२१-२०२२ हे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालक अनेक समस्यांना तोंड देत आहेत. मागील वर्षीची फी भरली नसल्याने काही ठिकाणी मुलांचे निकाल, तर काही ठिकाणी टीसी रोखून धरले जात आहेत. काही पालकांना शाळा सोडल्याचे दाखले थेट घरी पाठवले जात आहेत. मागील वर्षी लॉकडाऊन काळात खासगी शाळांची खर्च बचत होऊनही फी कमी केली नाही. तसेच महाराष्ट्र सरकारने काढलेल्या आदेशाला कोर्टात आव्हान दिले गेल्यावरच्या कोर्ट निर्णयामुळे पालकांना काहीच दिलासा मिळाला नाही. आपण सक्षम आदेश न काढता शाळांना खूप इशारे दिले. परंतु शाळांनी त्याला कचऱ्याची टोपली दाखवत मुलांचे ऑनलाईन शिक्षण रोखत मनमानी फी वसुलीचे सर्व मार्ग अवलंबले आहेत.
या पत्रातील मुद्द्यांची नोंद घेऊन योग्य पावले न उचलल्यास रस्त्यावर उतरण्यासोबत पीडित पालकांच्यावतीने आम्ही व सर्व संबंधित घटक बाल हक्क संरक्षण आयोग, न्यायालय आदी ठिकाणी आपल्याविरुद्ध दाद मागण्याचा हक्क बजावू, असा इशाराही या निवेदनाद्वारे सातारा आम आदमी पार्टीतर्फे सागर भोगांवकर यांनी दिला आहे.
यावेळी सातारा जिल्हा आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, सचिव महेंद्र बाचल, विजयकुमार धोतमल, अॅड. इम्तियाज खान, अॅड. विजय खामकर, तात्या सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.