गोंदवलेमध्ये ‘श्री राम जय राम जय जय रामऽऽ’चा जयघोष, महोत्सवाची सांगता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 02:05 PM2022-12-19T14:05:33+5:302022-12-19T14:05:59+5:30
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता
दहिवडी : गोंदवले बुद्रुक येथे ‘श्री राम जय राम जय जय राम’च्या या नामस्मरणाच्या जयघोषात श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता रविवारी पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी समाधीवर गुलाल, पुष्प अर्पण करुन झाली. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम.. या भक्तिभावाने परिसर न्हाऊन निघाला होता. पहाटेच्या थंडीतही टाळाचा गजर अन् मुखाने हरिनामाचा जप करण्यात भाविक तल्लीन झाले.
महोत्सवास लाखो मुंबई, पुण्यासह परराज्यातून, तसेच माण तालुक्यातील परिसरातून भाविक मोठ्या संख्येने उत्साहात उपस्थित होते. कोठी पूजनाने प्रारंभ झालेला हा उत्सव दहा दिवसांपासून भावपूर्ण वातावरणात सुरू होता. समाधीवर अखंड रामनाम जप सुरू होता. संपूर्ण मंदिर परिसर गजबजून गेला होता.
ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर परिसरावर आकर्षित विद्युत रोषणाई करण्यात आल्याने परिसर उजळून निघाला होता. सोहळ्यानिमित्त श्रींच्या समाधी मंदिराची चांगल्या प्रकारे सुंदर सजावट करुन मंदिराच्या संपूर्ण शिखरासह परिसरात रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहाटे २ वाजून ३० मिनिटांनी मंदिर मुख दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटे सव्वातीन वाजता मंदिरात पहिली घंटा करण्यात आली. साडेतीन ते चार वाजता सनईचे मंजुळ वादन करण्यात आले. चार ते पावणेपाच या दरम्यान भुपाळी काकड आरतीनंतर मंगल धुन सनईने सुरुवात करून धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.
यावेळी महाराजांच्या विचारावर कीर्तनरूपी मार्गदर्शन करण्यात आले. मुख्य समाधी मंदिरात महाराजांच्या समाधीला वस्त्र चढवून त्यावर तुळशी फुले अर्पण करण्यात आली. पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी समाधी मंदिरातून ‘श्रीराम श्रीराम श्रीराम” असा जयघोष सुरु झाल्यावर जमलेल्या लाखो भाविकांनी मोठ्या चैतन्यमय प्रसन्नतेत समाधीवर गुलाल फुलांची उधळण केली. सर्व भाविकांना समाधी मंदिरात आणि भोजन कक्षात सुरू असणारे कार्यक्रम पाहता यावेत म्हणून ठिकठिकाणी स्क्रिनची व्यवस्था केली होती. त्यामुळे भाविकांना हा सोहळा चांगल्या प्रकारे पाहता आला. मंदिर परिसरात जाऊन भाविकांनी दर्शन घेतले.
श्रींचे फोटो, मिठाई, दैनंदिन वापराच्या वस्तू, प्रसाद, पेढे, जिलेबी खरेदीसाठी भाविकांची वर्दळ होती. महिला पर्स, लहान मुलांची खेळणी, थंडीत वापराच्या वस्तू खरेदी करताना दिसत होत्या. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन, समाधी मंदिर समिती, ग्रामपंचायतीने सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार श्रीशैल्य व्हट्टे यांची उपस्थिती होती.
पोलिस उपविभागीय अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे, गोपनीयचे प्रकाश इंदलकर, वाहतूक शाखा व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख व्यवस्था ठेवली. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, सरपंच जयप्रकाश कट्टे, उपसरपंच संजय माने, अंगराज कट्टे आदींनी भाविकांचे स्वागत केले.