कासच्या साकव पुलाचे काँक्रीट ढासळले
By admin | Published: April 29, 2017 01:04 PM2017-04-29T13:04:52+5:302017-04-29T13:04:52+5:30
पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
लोकमत आॅनलाईन
सातारा , दि. २९ : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या सांडव्यासमोर असणारा साकव पूल मोडकळीस आला असून धोकादायक स्थितीत उभा आहे. तसेच या पुलाच्या खालच्या बाजुने मोठ्या प्रमाणावर बांधकामाचे काँक्रीट पडलले असून हा पूल केव्हाही कोसळून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिल्हयातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून कासची ओळख आहे. पावसाळयात चोहो बाजूला दाट हिरवीगार गर्द झाडी, ठिकठिकाणी कोसळत असणारे छोटे-मोठे धबधबे , पठारावरील विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुले पाहण्यासाठी जिल्हा, तसेच राज्या राज्यातून पर्यटकांची आपसुक पावले कास पठाराकडे वळत असतात.
कास पठार पाहण्यासाठी आलेले बहुसंख्य पर्यटक नेहमीच कास तलाव पाहण्यासाठी गर्दी करतात. कित्येक पर्यटक तलावाच्या दक्षिणेस असणाऱ्या जुन्या साकव पुलाकडे धाव घेतात. मात्र सध्या या पुलाचे काँक्रीट ढासळल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा पूल दुरूस्त होत नाही तोपर्यंत सध्या पर्यटकांसाठी बंद ठेवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)