शेंद्रे परिसरात महामार्गालगतच्या सेवा रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:42 AM2021-01-13T05:42:16+5:302021-01-13T05:42:16+5:30
शेंद्रे : सातारा तालुक्यातील शेंद्रे परिसरात राष्ट्रीय महामार्गालगतच्या सेवा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले ...
शेंद्रे : सातारा तालुक्यातील शेंद्रे परिसरात राष्ट्रीय महामार्गालगतच्या सेवा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, बहुतांश ठिकाणी रस्त्याची खडी निघाल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ता खराब असल्याने या परिसरात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
गेल्या काही दिवसांपासून खिंडवाडी ते शेंद्रे या परिसरातील सेवा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यातील पाणी बहुतांश ठिकाणी रस्त्यावर येत असल्याने बऱ्याच ठिकाणी रस्त्याची खडी उखडलेली आहे, तसेच रस्त्याला छोटे-मोठे खड्डे पडलेले आहेत. स्थानिक लोकांनी या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली असता, प्रशासनाकडून रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. त्यामुळे काही दिवसांतच रस्त्याची परत दुरवस्था होत आहे. या दिवसात साखर कारखाने सुरू असल्याने महामार्गावर ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यामुळे रात्रीच्यावेळी दुचाकीचालक सेवारस्त्याचा वापर करत आहेत. परंतु सेवारस्त्याला छोटे-मोठे खड्डे असल्याने दुचाकीचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी काही दुचाकीचालकांना अपघाताला सामोरे जावे लागले. तसेच या परिसरातील शेतकरी व नागरिक या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक व परिसरातील ग्रामस्थांच्याकडून करण्यात येत आहे.
११शेंद्रे
फोटो शेंद्रे (ता. सातारा ) परिसरात महामार्गालगतच्या सेवा रस्त्याची दुरवस्था झाली आहे.