किरकोळ कारणावरुन सातारा बसस्थानकात वाहकाला मारहाण, गुन्हा दाखल
By दत्ता यादव | Published: March 7, 2023 07:22 PM2023-03-07T19:22:36+5:302023-03-07T19:23:04+5:30
या प्रकारानंतर वाहक मोहन जगदाळे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली
सातारा : पायाजवळ दुचाकी आणून वाहकाला मारहाण केल्याची घटना सातारा सस्थानकात दि. ५ रोजी दुपारी चार वाजता घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
स्वप्नील अशोक पवार, रोहन अशोक पवार (रा. सहकारनगर, करंजे पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोहन परशुराम जगदाळे (वय ४५, रा. कुमठे, ता. कोरेगाव, जि. सातारा) हे एसटी वाहक आहेत. दि. ५ रोजी दुपारी बसचे चालक किरण वाघ यांच्यासमवेत नाष्टा करण्यासाठी जात होते. त्यावेळी स्वप्नील पवार हा त्यांच्या पायाजवळ गाडी घेऊन आला. त्यावर जगदाळे यांनी ‘थांब जरा माणसे तरी बघा,' असे म्हणाले. यामुळे चिडून ‘थांब तुला दाखवतो,’ असे बोलून तो तेथून निघून गेला.
थोड्या वेळाने वाहक जगदाळे व चालक वाघ हे दोघे नाष्टा करून बसजवळ आले.
तेव्हा ‘तू खाली ये तुला दाखवतो,’ असे म्हणून बसमध्ये चढू लागल्यावर जगदाळे यांनी प्रवाशांचे तिकीट काढण्याचे थांबवले. ते बसमधून खाली उतरताच स्वप्नील पवार आणि रोहन पवार या दोघांनी जगदाळे यांना मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. यानंतर दोघे तेथून निघून गेले. या प्रकारानंतर वाहक मोहन जगदाळे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सहायक फाैजदार डी. जी. पवार हे अधिक तपास करीत आहेत.