गुन्हा कबूल; पण फिर्यादी कुठाय?
By admin | Published: February 12, 2016 09:48 PM2016-02-12T21:48:46+5:302016-02-12T23:44:35+5:30
महामार्गावरील लुटालूट : हतबलतेमुळे चोरट्यांचे फावले; वाहतूक पोलिसांची ‘टार्गेट’मागे धावाधाव--बातमीनंतरची बातमी...
राजीव मुळ्ये-- सातारा: महामार्गावर लुटले गेल्यास थोड्या-थोडक्या रकमेसाठी कुणी फिर्याद नोंदवत नाही, हे हेरून जिल्ह्यात ट्रकचालकांना लुटणारी टोळकी तयार झाली आहेत. कोर्टकचेऱ्यांसाठी हेलपाटे मारणे ‘लाइनवरच्या’ चालकाला शक्यच नसते. महामार्ग प्राधिकरण आणि रस्तेबांधणी कंपनीचा वसुलीशिवाय कोणत्याही गोष्टीशी संबंध उरलेला नाही. शिवाय महामार्ग पोलीस, जिल्हा वाहतूक शाखा ‘टार्गेट’ पूर्ण करतानाच घामाघूम होत असल्यामुळे चोरट्यांचे फावले आहे.
ट्रकचालकांना पहाटेच्या वेळी एकटे-दुकटे गाठून लुटल्याप्रकरणी तीन जणांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील एक अल्पवयीन आहे. पाठोपाठ शहर पोलिसांनीही एकाला अटक केली. मात्र, त्यांच्या चौकशीतून वाटमारीच्या जितक्या घटना समोर येत आहेत, त्याच्या एकतृतीयांश संख्येनेही फिर्यादी दाखल नाहीत, ही खरी अडचण आहे. फिर्यादी असलेल्या दोन-तीन घटनांबाबत आरोपपत्रे दाखल होतील; परंतु एकंदर घटनांच्या तुलनेत होणारी शिक्षा अत्यल्प असेल, ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर, महामार्गावरील लुटीच्या घटनांबाबत स्वतंत्र यंत्रणेबरोबरच ट्रकचालकांमध्ये जागरुकता, वाहतूक पोलिसांची सतर्कता तसेच महामार्ग प्राधिकरण आणि रस्तेबांधणी कंपनीने सुरक्षेतील वाटा उचलणे अशी त्रिसूत्री आवश्यक ठरणार आहे. असे झाल्यास त्या-त्या भागातील पोलीस ठाण्यांवर पडणारा अतिरिक्त भारही हलका होणार आहे.
जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचारी महामार्गावर अनेकदा दिसतात; मात्र वाहतूक सुरळीत करणे हे त्यांचे पहिले काम असताना केसेसचे आणि दंडवसुलीचे ‘टार्गेट’ पूर्ण करणे हीच त्यांची पहिली जबाबदारी होऊन बसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. खरे तर महामार्गावर मध्येच कुठेतरी वाहन उभे करता येत नाही. परंतु पहाटे ट्रकचालक प्रातर्विधीसाठी मध्येच थांबतात आणि लुटांची शिकार बनतात, असे दिसून आले आहे. पहाटेच्या वेळी वाहतूक शाखेने गस्त घालून अशा चालकांना हटकले तर अनेक घटना टळू शकतात. हॉटेल, ढाबे अशा वर्दळीच्या ठिकाणी लूटमार होत नसल्याने तेथेच थांबणे श्रेयस्कर आहे, याबाबत चालकांमध्येही जागरुकता निर्माण करणे गरजेचे बनले आहे. रस्तेबांधणीच्या करारात रुग्णवाहिका, गस्ती वाहन, क्रेन आदी पुरविणे अंतर्भूत असते. परंतु अशा कोणत्याही गोष्टी जिल्ह्यात उपलब्ध होताना दिसत नाहीत. परिणामी, लुटांना अनेक एकाकी ठिकाणे हेरता आली, असे तपासातून पुढे येत आहे. पकडलेल्या टोळक्याने सातारा शहर, तालुका, बोरगाव आणि भुर्इंज पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केले आहेत. त्या-त्या ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर इतर गुन्ह्यांबरोबरच या घटनांचा अतिरिक्त भार पडत आहे.
चालकाकडील थोडीफार रोकड, अंगठी-चेन, मोबाइल अशा माफक वस्तू चोरट्यांना मिळत असल्या तरी तक्रार दाखल न होण्याच्या खात्रीमुळे त्यांचे फावले असून, नोंद न झालेल्या गुन्ह्यांची संख्या बरीच वाढली आहे. अनेक सुशिक्षित तरुण चैनीसाठी या मार्गाचा अवलंब करीत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची उकल करण्याबरोबरच दाखल न होणाऱ्या या गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्याचे आव्हान सर्वांना पेलावे लागणार आहे.
परप्रांतीय ट्रकचालक लक्ष्य
‘एमएच’ने सुरू होणाऱ्या क्रमांकाऐवजी ‘केए’, ‘जीजे’, ‘टीएन’ने सुरू होणाऱ्या क्रमांकांचे ट्रक टोळक्यांकडून लक्ष्य केले जातात. ट्रकचालक महाराष्ट्राबाहेरील आहे, हे एकदा स्पष्ट झाले की दोन फायदे होतात. एक तर टोळक्याच्या ताकदीचा आणि व्याप्तीचा अंदाज चालकाला सहजासहजी येत नाही. दुसरे म्हणजे दोन-पाच हजारांचा ऐवज गेला म्हणून तो फिर्याद दाखल करत नाही. कारण साक्षीसाठी येणे त्याला शक्य नसते. त्यातून एखादी फिर्याद दाखल झालीच तरी पोलिसांचा तपासाचा खर्चही चोरीला गेलेल्या मुद्देमालापेक्षा अधिक येतो.
स्वतंत्र यंत्रणा आवश्यक
महामार्गावरील अशा गुन्ह्यांची नोंद, तपास आणि सुनावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध करता येईल का, याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण, फिर्यादी दाखल होण्याचे प्रमाण गुन्ह्यांच्या संख्येपुढे नगण्य असून, साक्षीसाठी येणेही शक्य आणि व्यवहार्य ठरत नाही. परंतु त्यामुळे गुन्ह्यांच्या संख्येकडे डोळेझाक करता येत नाही; कारण यातूनच पुढे मोठी लुटालूट, लुटीस विरोध करणाऱ्यास गंभीर दुखापत अशा घटना घडू शकतात.
पहाटेची वेळ चोरट्यांच्या सोयीची
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते अजंठा चौक या भागात रात्री अशा घटना घडत असत; मात्र या भागात गस्त सुरू केल्यानंतर त्या बंद झाल्या आहेत. खिंडवाडी भागात पहाटेच्या वेळी वारंवार अशा घटना घडतात.
- राजीव मुठाणे, निरीक्षक, सातारा शहर पोलीस ठाणे
ट्रकचालकांनी सकाळच्या वेळी फ्रेश होण्यासाठी वर्दळ असलेल्या ठिकाणी थांबणेच योग्य ठरेल. ढाबाचालकांकडे पार्किंगला जागा आहेत. त्यामुळे ढाबे, हॉटेल्स, पेट्रोल पंप अशी ठिकाणे पाहूनच थांबणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ठरेल.
- दत्तात्रय नाळे, निरीक्षक, सातारा तालुका पोलीस ठाणे
ही ठिकाणे धोकादायक
खिंडवाडी ते चिंध्यापीर : शहर पोलीस ठाणे
वाढे फाटा ते लिंब खिंड : तालुका पोलीस ठाणे
वेळे गावाचा परिसर : भुर्इंज पोलीस ठाणे
वळसेच्या पुढील परिसर : बोरगाव पोलीस ठाणे