जखीणवाडीत संघर्ष; पण सत्ता अबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:37 AM2021-01-20T04:37:34+5:302021-01-20T04:37:34+5:30
मलकापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत जखीणवाडीमध्ये पक्षीय पातळीवर, तर नांदलापूरसह चचेगावात भावकी आणि गावपातळीवरील राजकारणाची सरशी झाली. जखीणवाडीत चव्हाण-उंडाळकर गटाने ...
मलकापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत जखीणवाडीमध्ये पक्षीय पातळीवर, तर नांदलापूरसह चचेगावात भावकी आणि गावपातळीवरील राजकारणाची सरशी झाली. जखीणवाडीत चव्हाण-उंडाळकर गटाने सत्ता अबाधित ठेवली. नांदलापुरात दोन माजी सरपंचांच्या गटाला झुकते माप देत मतदारांनी पुन्हा संधी दिली, तर चचेगावात पूर्वीप्रमाणेच उंडाळकर-भोसले गटाला यश मिळवता आले.
कऱ्हाड तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या जखीणवाडीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोधाला फाटा देत सर्व ११ जागांवर निवडणूक झाली. ऐनवेळी उदयसिंह पाटील व पृथ्वीराज चव्हाण गटात समेट होऊन उंडाळकर गटाच्या सर्व उमेदवारांनी आपली उमेदवारी काढून घेतली. त्यामुळे चव्हाण-उंडाळकर विरुद्ध भोसले गटातच मुख्य लढत झाली. या चुरशीच्या लढतीत रामचंद्र पाटील व अॅड. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने ११ पैकी ७ जागा जिंकत अनेक वर्षांपासूनची सत्ता अबाधित ठेवली. विरोधी डॉ. अतुल भोसले गटाला ४ जागा मिळाल्या.
चचेगावात अकरा जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत पक्षीय पातळीला महत्त्व न देता गावपातळी व भावकीला प्राधान्य मिळाले. उंडाळकर व भोसले गटाने एकमेकांच्या हातात हात घालून निवडणूक लढवली. या निवडणुकीत उदयसिंह पाटील-उंडाळकर गटाला ३, डॉ. अतुल भोसले गटाला ४, तर आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाला ४ जागा जिंकता आल्या.
नांदलापूर ग्रामपंचायतीत ९ सदस्य संख्या असून, अशोकराव थोरात यांना मानणाऱ्या गोपाळ वस्तीमधील एक महिला अर्ज माघारीच्या मुदतीत बिनविरोध निवडून आली होती. उर्वरित ८ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत नांदलापुरात वरिष्ठ नेत्यांच्या पक्षीय राजकारणाला बगल देत भावकी व गावपातळीवरील राजकारणाला प्राधान्य दिले गेले. विलास शिर्के, मानसिंग लावंड व प्रदीप शिर्के या माजी सरपंचांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली. या आठ जागांपैकी विलास शिर्के यांना ३, मानसिंग लावंड यांना ३ व प्रदीप शिर्के यांना २ जागांवर विजय संपादन करता आला.
- चौकट
नांदलापुरात सत्ता कुणाची?
नांदलापुरात मानसिंग लावंड व प्रदीप शिर्के हे उंडाळकर व चव्हाण यांना मानतात, तर विलास शिर्के यांच्यासह बिनविरोध निवडून आलेले डॉ. अतुल भोसले यांचे नेतृत्व मानतात. हे चित्र पाहता नांदलापुरात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना मानणाऱ्या गटाची सत्ता येईल, असे चित्र आहे. मात्र, सरपंच आरक्षण सोडतीनंतर नेमकी सत्ता कोणाची, हे स्पष्ट होईल.