‘कास’चा पाणी पुरवठा बंद करण्याबाबत संभ्रम : पर्यायी व्यवस्थेचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:13 PM2018-12-25T23:13:25+5:302018-12-25T23:14:43+5:30
कास धरणाचे काम जवळपास चाळीस टक्के पूर्ण झाले असून, धरणाकडून जलशुद्धीकरण केंद्राकडे येणाऱ्या पाण्याच्या पाटापर्यंत भिंत उभारली जाणार आहे. या कामासाठी सुमारे पंधरा दिवस कालावधी
सातारा/पेट्री : कास धरणाचे काम जवळपास चाळीस टक्के पूर्ण झाले असून, धरणाकडून जलशुद्धीकरण केंद्राकडे येणाऱ्या पाण्याच्या पाटापर्यंत भिंत उभारली जाणार आहे. या कामासाठी सुमारे पंधरा दिवस कालावधी लागणार असून, या कालावधीत शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्थेवर चर्चा सुरू आहे. पालिका, जलसंपदा विभाग व जीवन प्राधिकरणची बैठक झाल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
सातारा शहराला पाणीपुरवठा करणारी कास ही सर्वात जुनी योजना आहे. एक मार्च २०१८ पासून धरणाची उंची वाढविण्याचे काम जलसंपदा विभागाने हाती घेतले आहे. आतापर्यंत चाळीस टक्के काम पूर्ण झाले आहे. दोन डोझर, दोन रोलर, सात पोकलेन, पंचवीस डंपर तसेच ७५ कर्मचाºयांच्या मदतीने हे काम सुरू आहे. धरणाकडून जलशुद्धीकरण केंद्राकडे येणाºया पाण्याच्या पाटापर्यंत नवी भिंत उभारली जाणार आहे. या कामामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो; परंतु पाणीपुरवठा विस्कळीत न करता पर्यायी व्यवस्था करूनच भिंतीचे काम हाती घेणार असल्याची माहिती मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिली.
ते म्हणाले, ‘कास धरण ही पालिकेची महत्त्वाकांक्षी योजना आहे. धरणाचे काम सध्या गतीने सुरू आहे. भिंतीचे काम सुरू झाल्यानंतर पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो; परंतु या समस्येवर योग्य तो तोडगा काढला जाईल. जीवन प्राधिकरणचे पाणी उपलब्ध झाल्यास ही समस्याही संपुष्टात येईल. कासचे पाणी पंपिंग करून पुुन्हा पाटात सोडल्यास पाणीपुरवठा अखंडित राहू शकतो. याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. पालिका, जलसंपदा विभाग व जीवन प्राधिकरणची बैठक झाल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. नागरिकांना कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नयेत, याची पालिका व जलसंपदा विभागाकडून काळजी घेतली जाणार आहे.
पाणीपुरवठा बंद होणार नाही : श्रीकांत आंबेकर
ज्या बंदिस्त पाईपलाईनमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्या पाईपलाईनच्या कडेला संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा दुसरीकडून वळविला जाणार आहे. कासचा पाणीपुरवठा बंद होणार नाही; मात्र तो कमी-जास्त प्रमाणात होऊ शकतो. या कामाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत केली आहे. जोपर्यंत कासचे पाणी वळविले जात नाही, तोपर्यंत भिंतीच्या कामास प्रारंभ होणार नाही. उदयनराजे यांनीही संबंधित विभागास याबाबतच्या सूचना केल्या आहेत. हे काम सुरू करण्यापूर्वी नागरिकांनी चार दिवस अगोदर पूर्वकल्पना देण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.