‘निपाह’च्या दाव्याने महाबळेश्वरमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:25 AM2021-06-23T04:25:49+5:302021-06-23T04:25:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क महाबळेश्वर : निपाह व्हायरस महाबळेश्वरच्या जंगलातील गुहेमध्ये असलेल्या वटवाघळांमध्ये सापडल्याचा दावा पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ ...

Confusion in Mahabaleshwar over Nipah's claim | ‘निपाह’च्या दाव्याने महाबळेश्वरमध्ये संभ्रम

‘निपाह’च्या दाव्याने महाबळेश्वरमध्ये संभ्रम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

महाबळेश्वर : निपाह व्हायरस महाबळेश्वरच्या जंगलातील गुहेमध्ये असलेल्या वटवाघळांमध्ये सापडल्याचा दावा पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ वायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, या व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला एकही रूग्ण महाबळेश्वर परिसरात नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांनी केलेला या दाव्याबाबत शहरातून शंका व्यक्त केली जात आहे.

महाबळेश्वरपासून दहा किलोमीटर अंतरावर मालुसरवाडी हे गाव आहे. या गावापासून एक किलोमीटर अंतरावर ‘रॉबर्स केव्ह’ नावाची गुहा आहे. याला स्थानिक भाषेत ‘सीमसीम घळ’ असेही संबोधले जाते. या गुहेत अनेक वर्षांपासून वटवाघळांची वसाहत आहे. वटवाघळांच्या अनेक जाती आहेत; परंतु या गुहेतील वटवाघळ अत्यंत दुर्मिळ आहेत. मार्च २०२० मध्ये पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ वायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी वटवाघळांचे नमुने गोळा केले. यावर संशोधन करून त्यांनी त्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार महाबळेश्वरच्या गुहेत असलेल्या दोन वटवाघळांमध्ये निपाह हा अतिघातक व्हायरस सापडला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

निपाह हा व्हायरस कोरोनापेक्षा अधिक घातक आहे. कारण कोरोनाचा मृत्युदर हा दोन टक्के तर निपाहचा मृत्यूदर हा ६५ ते १०० टक्के आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या वृत्तांचे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्याप्रमाणे वटवाघळात निपाह हा व्हायरस असला तरी या व्हायरसचा प्रादुर्भाव स्थानिक लोकांना कधीच झाला नाही. निपाह या विषाणूची लक्षणे असलेला रूग्ण या भागात कधी आढळला नाही. ज्या कोरोनाने जगात थैमान मांडले आहे त्या कोरोनाची लागणदेखील या गुहेजवळ असलेल्या मालुसर गावातील एकाही व्यक्तीला झाली नाही, असा दावा या गावचे जेष्ठ नागरिक व माजी सरपंच इक्बाल मुलाणी यांनी केला.

(चौकट)

.. तर गुहा बंद करा

कोरोनामुळे महाबळेश्वरची आर्थिक घडी अगोदरच विस्कटली आहे. त्यातच निपाह विषाणूमुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या या दाव्याची सत्यता पुन्हा तपासून यामध्ये सत्यता असेल तर ती गुहा कायमची बंद करावी, विषाणू गुहेतून बाहेर येणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणीही नागरिकांमधून केली जात आहे.

फोटो : २२ महाबळेश्वर

महाबळेश्वर तालुक्यातील मालुसरवाडी येथील याच गुहेत वटवाघळे आहेत. येथील दोन वटवाघळांमध्ये निपाह विषाणू असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. (छाया : अजित जाधव)

Web Title: Confusion in Mahabaleshwar over Nipah's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.