कूपन सीस्टिममुळे लसीकरणात गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:41 AM2021-05-12T04:41:06+5:302021-05-12T04:41:06+5:30
कोरेगाव : येथील उपजिल्हा रुग्णालयात नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरणाला खोडा बसला आहे. सकाळी सात वाजता वाटण्यात येणारी कूपन्स यामुळे लसीकरण ...
कोरेगाव : येथील उपजिल्हा रुग्णालयात नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरणाला खोडा बसला आहे. सकाळी सात वाजता वाटण्यात येणारी कूपन्स यामुळे लसीकरण विस्कळीत झाले. मंगळवारी लसींचा अपुरा पुरवठा असल्याने कूपन वाटताना मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करून
जमाव पांगविण्यात आला.
उपजिल्हा रुग्णालय परिसरात काडसिद्ध कोरोना हॉस्पिटलसह शासकीय डीसीसीएच लसीकरण केंद्र असल्याने मोठी गर्दी आहे. त्यातच दोन्ही आमदारांना मानणारे समर्थक आणि राजकीय कार्यकर्त्यांचा वावर वाढला आहे. त्यांच्या हस्तक्षेपामुळे लसीकरण पूर्णत: कोलमडून गेले आहे. अगोदर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून लसीचा तुटवडा आहे. त्यातच कूपन वाटण्याची व्यवस्था सकाळी सात वाजता करण्यात आल्याने पहाटेपासूनच उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात आणि परिसरात मोठी गर्दी उसळली. रुग्णालय प्रशासनाने शहरातील काही व्हॉट्सॲप ग्रुपवर केवळ ३५ कुपन्स वाटली जाणार असल्याची माहिती सोमवारी रात्री उशिरा दिली. मात्र, ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे २५० ते ३०० जणांचा जमाव कूपनसाठी पहाटेपासूनच जमला. सात वाजता कूपन वाटण्यास सुरुवात करण्यात आली, त्यावेळी केवळ ३५ कुपन्स वाटली जाणार असल्याचे सांगताच, मोठा गोंधळ उडाला. त्यातून अनेकांच्या शाब्दिक चकमकी उडाल्या. अखेरीस रुग्णालय प्रशासनाने पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे माहिती दिली, त्यानंतर, पोलीस फौजफाटा दाखल झाला आणि त्यांनी जमाव पांगविला.
चौकट :
अपूर्ण कर्मचारी वर्ग
उपजिल्हा रुग्णालयात अपुरे कर्मचारी असून, एकाच व्यक्तीकडे अनेक कामे देण्यात आल्याने गोंधळ उडत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी आता
तरी कोरेगावला दुजाभावाची वागणूक न देता, आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याची गरज आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे.
चौकट :
पोलीस बंदोबस्त वाढवा
पोलीस उपअधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर उपजिल्हा रुग्णालय असून, तेथे दिवसरात्र गर्दी असूनही, पोलीस यंत्रणा त्याकडे लक्ष देत
नाहीत. बंदोबस्तासाठी केवळ गृहरक्षक दलाचे जवान असून, पोलीस कर्मचारी नावालाच असतात. जिल्हा पोलीस प्रमुखांनी कायमस्वरूपी एक अधिकारी, चार कर्मचारी, वाहतूक शाखेचे दोन कर्मचारी नेमल्यास या परिसरात गर्दी होणार नाही आणि त्यातून कोरोनाचा प्रसार होणार नाही.