कॉँगे्रसवाल्यांनो.. हवेतून खाली या !
By admin | Published: February 11, 2015 10:04 PM2015-02-11T22:04:17+5:302015-02-12T00:35:35+5:30
वाल्मिकींचा घरचा आहेर : बैठकीतील कमी उपस्थिती पाहून तीव्र नाराजी
सातारा : ‘काँग्रेसचा हात गरिबांच्या साथीला, असं फक्त आपण म्हणत असतो. गरिबांना मारलं, लुटलं जात आहे, तरीही आपण त्यांना साथ मात्र देत नाही. त्यामुळेच आता दिल्लीत अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले आहेत. काँग्रेसची ही स्थिती बदलायची असेल, तर आपल्याला हवेतून खाली आले पाहिजे; तरच पक्ष मजबूत होईल,’ अशा शब्दांत अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी श्योराज जीवन वाल्मिकी यांनी सर्वांनाच सुनावत घरचा आहेर दिला.
दरम्यान, यावेळी त्यांनी बैठकीला कमी उपस्थिती पाहून नाराजी व्यक्त करीत जिल्हा काँग्रेसबद्दल नापसंतीही व्यक्त केली.
येथील जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित बैठकीत त्यांनी मार्गदर्शन करतानाच पक्षासाठी योगदान देण्यास सर्वांनाच बजावले. यावेळी आमदार आनंदराव पाटील, अॅड. विजयराव कणसे, साहेबराव जाधव, बाबूराव जंगम गुरुजी, मनोजकुमार तपासे, रजनी पवार आदी उपस्थित होते. दरम्यान, प्रथम वाल्मिकी यांचा जिल्हा काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.
वाल्मिकी यांनी पक्षाला घरचा आहेर देतानाच दिल्लीपासून ते गावपातळीपर्यंतचा पक्षाची बाजू पदाधिकाऱ्यांच्या समोर आणली. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कौतुकही केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आपल्या देशात साधी सुई बनत नव्हती; पण काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यापासून देशाचा विकास होऊ लागला. पक्षाने सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद दिली. पक्षाने देशावर अनेक वर्षे राज्य केले. पण, आज पक्षाची स्थिती कमकुवत आहे. याला कारणे काय आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे. गरिबांचे कैवारी म्हणत असलो तरी आपण तसे वागतो का, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण गरिबांच्या बाजूने आपण राहत नाही. दिल्लीत केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना काँग्रेसची म्हणजेच गरीब आणि झोपडपट्टीतील लोकांची मते मिळाली आहेत. आपल्याला पुन्हा मजबूत व्हावे लागेल. त्यासाठी हवेतून आपल्याला खाली यावे लागेल. सर्वांनी चिंतन, मनन करावे व पक्षाच्या वाढीस हातभार लावावा.’
आमदार आनंदराव पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यात पूर्वी काँग्रेसचा एक आमदार होता. आज दोन आमदार पक्षाचे आहेत. जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे संघटन सुरू आहे. आगामी काळात नगरपालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी करणे गरजेचे आहे.’
अॅड. कणसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमुळे पक्षाचे नुकसान झाल्याची तोफ डागली. ते पुढे म्हणाले, ‘काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत मरगळ आली आहे. याला अनेक कारणे आहेत. जिल्ह्यात आज भाजपचा एकही आमदार नाही. आज दिल्लीतील निकालाने देशातील जनता कोणाची गुलाम नाही, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे यापुढे आपण कसे लोकांपुढे जायचे, याचा विचार करण्याची आज खरी गरज आहे. (प्रतिनिधी)
आठपैकी पाच पालिका कॉँग्रेसच्या !
बैठकीत मार्गदर्शन करताना विजयराव कणसे यांनी जिल्ह्यातील आठपैकी पाच नगरपालिका पक्षाकडे आहेत, असे सांगितले. हे एकताच , उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते चमकून एकमेकांकडे पाहू लागले. सर्वांच्याच चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव स्पष्टपणे दिसून येत होते.