सातारा राहिला, पण माढा निसटला; शिलेदार गेले, पवार मैदानात उतरले...
By नितीन काळेल | Published: October 19, 2023 07:01 PM2023-10-19T19:01:04+5:302023-10-19T19:04:29+5:30
सातारा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला. त्यामुळे जिल्ह्याने नेहमीच काँग्रेसला साथ दिली. पण, १९९९ ला शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना केली.
सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी पाच महिन्यांचा अवधी असून राष्ट्रवादी काँग्रेसने तयारीही सुरु केली आहे. यासाठी मुंबईत बैठकही झाली. यामध्ये सातारा आणि माढ्यासाठी अध्यक्ष शरद पवार स्वत: लक्ष घालणार आहेत. पक्षातील दुफळीनंतर अनेक शिलेदार सोडून गेले तरीही पवारांना आता निष्ठावंताची साथ आणि सोबतीला काँग्रेसला घेऊन ही खिंड लढवावी लागणार आहे.
सातारा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला. त्यामुळे जिल्ह्याने नेहमीच काँग्रेसला साथ दिली. पण, १९९९ ला शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळीपासून जिल्हा पवार यांच्या पाठिशी राहिला. पण, २०१९ च्या निवडणुकीदरम्यान बालेकिल्ल्याला भगदाड पडत गेले. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद कमी झाली. त्यातच सातारा लोकसभा मतदारसंघ जिंकलातरी माढ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला. आतातर पक्षातच उभी फूट पडली. त्यामुळे दोन गटात पक्ष विभागल्याने सातारा राखायचाय तर माढा लोकसभा मतदारसंघ पुन्हा मिळवायचा आहे. यासाठीच मुंबईतील बैठकीत शरद पवार यांनी सातारा, माढ्यासाठी स्वत: लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले.
सातारा लोकसभा मतदारसंघात१९९९ पासून राष्ट्रवादीचा खासदार निवडूण येत आहे. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर २००९ लाही राष्ट्रवादीचेच उमेदवार उदयनराजे भोसले विजयी झाले. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील आणि राष्ट्रवादीचे उदयनराजे यांच्यात जोरदार सामना झाला. तरीही उदयनराजे तिसऱ्यांदा खासदार झाले. मात्र, त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याने पोटनविडणूक झाली. यामध्ये भाजपकडून उदयनराजे आणि राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील मैदानात होते. यामध्येही राष्ट्रवादीने बालेकिल्ला राखला. २००९ पासून माढा मतदारसंघ अस्तित्वात आला. यामध्ये सोलापूरमधील चार आणि सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. २००९ ला शरद पवार यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले. २०१४ ला राष्ट्रवादीचेच विजयसिंह मोहिते-पाटील खासदार झाले. पण, २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांचा भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दारुन पराभव केला. आता शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी पक्षात दुफळी निर्माण केली आहे. यातून सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघातही दोन गट आहेत. यातून दोन्ही मतदारसंघात उमेदवार निवडूण आणायचे आहेत.
पक्षातील दुफळीनंतर राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे. तरीही येणाऱ्या निवडणुकीत सातारा मतदारसंघात खासदार श्रीनिवास पाटील ही पवार यांची पहिली पसंदी असणार आहे. पाटील हेही स्वत: मतदारसंघात फिरत असल्याने ते पुन्हा उमेदवार असतील असे संकेत आहेत. तसेच आमदार शशिकांत शिंदे, सत्यजित पाटणकर, सारंग पाटील यांचाही पर्याय असणार आहे. या मतदारसंघात पवार गटासाठी अनुकूल वातावरण आहे. पण, भाजपला हा मतदारसंघ ताब्यात घ्यायचा आहे. युतीत शिवसेनेकडे मतदारसंघ असलातरी मागील पोटनिवडणूक भाजपने लढविली. त्यामुळे भाजपचा उमेदवार असू शकतो. यासाठी राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे उमेदवार असू शकतात. तर युतीत अजित पवार गटाकडे हा मतदारसंघ जाण्याची शक्यता कमी वाटते. कारण, भाजपने दीड वर्षांपासून मतदारसंघाची तयारी सुरू केली आहे. यामध्ये शरद पवार यांना शिवसेनेचा ठाकरे गट आणि काॅंग्रेसची साथ मिळणार आहे. यावरच राष्ट्रवादीचे गणित अवलंबून असणार आहे.
माढ्यात शरद पवार गटाची ताकद कमी...
माढा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर खासदार आहेत. या मतदारसंघात शरद पवार गटाची ताकद कमी आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि फलटणचे आमदार दादा गटात आहेत. माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हेही दादांबरोबर आहेत. त्यामुळे शरद पवार या मतदारसंघात कसे फासे टाकतात यावर ही निवडणूक अवलंबून असेल. त्यातच सोलापूरच्या शिंदे बंधुंनी भाजप खासदार रणजितसिंह यांना दोन लाखांचे मताधिक्य देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे युतीत अजित पवार गटाकडे मतदारसंघ न गेल्यास रणजितसिंह यांना निवडणूक थोडी सोपी होईल. मात्र, आघाडीत शरद पवार गटाकडे मतदारसंघ गेल्यास त्यांचा उमेदवार कोण हे सध्यातरी स्पष्ट नाही.