काँग्रेसने काढले राष्ट्रवादीच्या आरोपांना किरकोळीत
By admin | Published: May 19, 2014 12:12 AM2014-05-19T00:12:03+5:302014-05-19T00:13:26+5:30
सातारा : ‘ज्या राष्ट्रवादीचा जन्मच गद्दारीतून झाला, त्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी, काँग्रेसने काय केले, याची विचारणा खासदार विजयसिंह मोहिते-पाटलांकडे जाऊन करावी.
सातारा : ‘ज्या राष्ट्रवादीचा जन्मच गद्दारीतून झाला, त्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी, काँग्रेसने काय केले, याची विचारणा खासदार विजयसिंह मोहिते-पाटलांकडे जाऊन करावी. आम्ही मदत केली नाही, असा खोटा आरोप करून काँग्रेसने गद्दारी केली म्हणणारे येळगावकर कोण?’ असा सवाल आमदार जयकुमार गोरे यांनी केला आहे. माण, खटाव आणि फलटणमध्ये काँग्रेसने गद्दारी केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना केला होता. येळगावकरांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली असली तरी काँग्रेसने मात्र येळगावकरांच्या आरोपांना किरकोळीत काढत राष्ट्रवादीच्या लोकांचीच राष्ट्रवादीला मतदान करण्याची मानसिकता नसल्याचा आरोप करीत पलटवार केला आहे. मी येळगावकर यांच्यापेक्षा मोठा नसल्याची कोपरखळी मारतच आमदार गोरे यांनी त्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘ज्या पक्षाचा जन्मच गद्दारीतून झाला, त्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी काँग्रेसच्या नावाने खडे फोडू नयेत. त्यांनी तोंडाला थोडा लगाम लावावा आणि बोलावे. राष्ट्रवादीतच मोठ्या प्रमाणात असंतोष असताना तो दूर करण्याऐवजी येळगावकरांना काँग्रेसवर टीका करण्यात धन्यता वाटते. राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना तुमच्याच पक्षाला मतदान करा, असे सांगण्याची वेळ आमच्यावर आली, याच्यासारखे दुर्दैव नाही, असेही गोरे म्हणाले.’ (प्रतिनिधी)