काँग्रेस नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय
By admin | Published: September 6, 2016 10:27 PM2016-09-06T22:27:07+5:302016-09-06T23:49:50+5:30
पृथ्वीराज चव्हाण : भैरवनाथनगरला विविध विकासकामांची उद्घाटने
कऱ्हाड : ‘विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरण्यासाठी आमच्या आघाडी सरकारने विदर्भास झुकते माप दिले होते. आम्ही कोणताही आकस बाळगून सरकार चालवले नाही; पण सद्याचे भाजप सरकार आकसाने पश्चिम महाराष्ट्राकडे पाहत आहे. त्याबरोबर काँग्रेसचे नेते टार्गेट करून त्यांच्या शिक्षण संस्थांवर छापे टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकारने चालवला आहे. सरकारचे विकासापेक्षा द्वेषाचे राजकारण सुरू असून, हे खेदजनक आहे,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
भैरवनाथ-काले, ता. कऱ्हाड येथील राजीव गांधी भवन या ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन, भैरवनाथनगर ते टकलेवस्ती रस्त्याचे उद्घाटन तसेच विविध विकासकामांच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. सरपंच सुभद्रा पाटील अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पै. नानासाहेब पाटील, बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, इंद्रजित चव्हाण, पंचायत समिती सदस्य राजेंद्र बामणे, सर्जेराव शिंदे, अॅड. ए. वाय. पाटील, अॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, कृष्णत थोरात, दिलीप पाटील, तालुका काँग्रेसचे प्रवक्ते पै. तानाजी चवरे, संघटक उदय पाटील-उंडाळकर, नितीन थोरात, रणजित देशमुख, भैरवनाथनगरचे उपसरपंच आर. एम. कोळी, जयकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार चव्हाण म्हणाले, ‘ सरकार विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रामध्ये विकासाचे अंतर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. यांनी निवडणुकीआधी करायची ती गडबड केली. आता त्यांच्या पक्षातील मंडळींची अवस्था काय आहे, हे मी सांगायला नको. आता त्यांच्या पक्षातील मंडळींची अवस्था काय आहे, हे मी सांगायला नको. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रशासन स्वच्छ केले. या कालावधीत अनेक निर्णय मार्गी लागल्याचे मला समाधान आहे; पण हे माझे काम आमच्या मित्रपक्षाला आवडले नाही. वर्णाश्रम अधारीत समाजव्यवस्थेकडे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ’
प्रारंभी दानशूर ज्येष्ठ नागरिक मारुती यादव, संभाजी थोरात यांचा आमदार चव्हाण यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला. आर. एम. कोळी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. (प्रतिनिधी)
माजी आमदार कुणाशीही प्रामाणिक नाहीत!
आमदार आनंदराव पाटील म्हणाले, ‘माजी आमदार कधीही कुणाशी प्रामाणिक राहिलेले नाहीत. विलासराव देशमुख यांच्या मतदार संघात त्यांना सन्मान दिला. विविध विकासकामांची त्यांच्या हस्ते उद्घाटने केली. त्याही दिग्गजांशी हे माजी आमदार कृतज्ञ वागल्याचे विलासराव देशमुख साताऱ्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर सांगायचे. त्या कृतज्ञ व्यक्तीचा जनाधार खऱ्या अर्थाने जनतेने संपवला आहे. ते ३५ वर्षे तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये होते. त्यांनी वैयक्तिक स्वार्थापोटी जिल्ह्यातील काँग्रेस संपविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अंगावरील पक्षाची झूल आता निघाल्याने कुणाशीही आघाड्या करत ते भरकटत चालले आहेत.’