महाराष्ट्रात सध्या पेशवाईच नाही का? नाना पटोलेंचा आरोप; शिवशाही व पेशवाईतील योग्य निवड करण्याची वेळ
By प्रमोद सुकरे | Published: December 3, 2022 08:33 PM2022-12-03T20:33:20+5:302022-12-03T20:34:02+5:30
पेशवाईने व शिवशाहीने नेमकं काय दिलं हे सर्वांना माहीत आहे.
प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क
पेशवाई व शिवशाही या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पेशवाईने व शिवशाहीने नेमकं काय दिलं हे सर्वांना माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा तर पेशवाईने अनेकदा अपमान केला आहे; हा इतिहास आहे. आज पुन्हा त्या छत्रपतींच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य राज्यपाल व इतर काहीजण करीत आहेत. त्यामुळे ही पेशवाईच नाही का? याचा अभ्यास करण्याची तसेच शिवशाही व पेशवाई यांच्यातील एकाची निवड करण्याची वेळ आली आहे असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.
कराड येथे शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पटोले म्हणाले, महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे काम गुजरात व कर्नाटक सरकारच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. म्हणून तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सोलापुरात कर्नाटक भवन बांधण्याची भाषा करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर यापूर्वीच मी मोदी शहांचा हस्तक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव सुरू आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे होऊ देणार नाहीत. ईडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.
भाजपचे केंद्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल ताळतंत्र सोडून वक्तव्य केली आहेत .प्रवक्त्याची भूमिका ही पक्षाची भूमिका असते .मग महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना ती भूमिका मान्य आहे का? याचे उत्तर त्यांनी द्यावे. मान्य नसेल तर त्याला विरोध करावा. नाहीतर पदाचा राजीनामा द्यावा असेही पटोले एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आला आहात काय सांगाल? असे विचारताच पटोले म्हणाले; संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यांनी आणला त्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची ही कर्मभूमी आहे. यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण असा याला इतिहास आहे. आज त्याच जिल्ह्यातील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत हे खरे आहे पण, अलिकडच्या काळात ० ते१वयोगटातील सुमारे १० हजार मुलांचा मृत्यू झालाय. त्यांना औषध मिळत नाही. मग हा पैसा जातो कुठे? हा माझा प्रश्न आहे. रोजगाराच्या संधी नाहीत; अतिवृष्टीतील शेतकऱ्यांना मदत मिळत नाही अन आता पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरीही आत्महत्या करू लागला आहे. या सगळ्या परिस्थितीत मी नेमकं काय बोलायचं?असा प्रश्न त्यांनी माध्यम प्रतिनिधींनाच केला.
लुटारुंना लुटण्याची संधी
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या अजय आशर या व्यक्तीवर आशिष शेलार यांनी लुटारू म्हणून आक्षेप घेतला होता; आरोप केले होते, त्याच व्यक्तीची एकनाथ शिंदेंनी नुकतीच मैत्री आयोगाच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे. मग लुटारुला सामान्य लोकांचे पैसे लुटण्याची ही संधीच दिली नाही का? असा सवालही पटोले यांनी यावेळी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"