‘काँग्रेस-राष्ट्रवादी’त आरोपांची आतषबाजी !
By admin | Published: November 5, 2016 12:19 AM2016-11-05T00:19:44+5:302016-11-05T00:53:38+5:30
खंडाळा नगरपंचायतीत जोरदार हालचाली : पक्षीय दावेदारीच्या अस्तित्वाची रणधुमाळी
खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत आता राजकीय पक्षांच्या चर्चांना ऊत आला आहे. कोणत्याही व्यासपीठावर नगरपंचायत डोळ्यासमोर ठेवून राजकीय वक्तव्यांची आतषबाजी केली जातेय. यानिमित्ताने सत्ताधारी काँग्रेस आणि प्रबळ विरोधी राष्ट्रवादीतून जोरदार हालचाली दिसून येत आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या रणांगणात पक्षीय दावेदारीने अस्तित्व कायम असणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
खंडाळा नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीचे १७ उमेदवार, काँग्रेसचे १७ उमेदवार, भाजपाचे १३, शिवसेनेचे ५ उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. याशिवाय काही प्रभागांत अपक्षही दंड थोपटण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, पारंपरिक तुल्यबळ असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा जोरदार लढतीची शक्यता आहे. त्याची नांदी सद्य:स्थितीत झालेल्या कार्यक्रमावरून स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादीची प्रमुख मदार असणारे आमदार मकरंद पाटील यांनी खंडाळा येथे कार्यक्रमात आपल्या खास शैलीतून आम्ही विरोधकांवर टीका करणार नाही. मात्र, खंडाळा तालुक्याचा विकास होत असताना खंडाळा शहरही या प्रवाहात आता आले पाहिजे, असे खोचक वक्तव्य करीत खंडाळकरांनी एकदा संधी निर्माण करण्याचे आवाहन करून खंडाळा नगरपंचायत आपल्या निशाण्यावर असल्याचे स्पष्ट केले. तर खंडाळ्यातील साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात कारखाना स्थळावर आजपर्यंत पहिल्यांदाच अध्यक्ष शंकरराव गाढवे यांनी सार्वत्रिक राजकारणाला स्पर्श करणारे विधान केले. आबासाहेब वीर यांना अभिप्रेत काम करून दाखवले आहे. कारखान्याच्या कर्जाचे माप काढणाऱ्यांना सुबुद्धी मिळो, चांगले पाहण्याची दृष्टी मिळो, अशी अप्रत्यक्ष टीका करीत वाईतील सभेत झालेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले. राजकारण करण्यासाठी खूप जागा आहेत, असेही सूचकपणे या सभेत वक्तव्य करण्यात आले होते.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाक्युद्धाचे फटाके फुटू लागले असले तरी यात अद्याप भाजपा-सेनेने जाहीर वक्तव्य केलेले नाही. मात्र, जर या दोहोंची युती झाली. तर तिसरा पर्याय सक्षमपणे उभा राहू शकतो. परंतु पक्षीय पातळीवर स्थानिक स्तरावर अद्याप कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. (प्रतिनिधी)