काँग्रेस-राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर !
By Admin | Published: July 10, 2015 10:13 PM2015-07-10T22:13:23+5:302015-07-10T22:13:23+5:30
एकाच दिवशी दोन मोर्चे : पोलीस खात्याची दमछाक; चिक्की अन् डिग्री प्रत्येकाच्या भाषणात
सातारा : राष्ट्रवादीनं विजयी मेळावे घ्यावेत. काँग्रेसनं शुभेच्छा सोहळा आयोजित करावा, ही आजपर्यंतची या दोन पक्षांची सातारा जिल्ह्यातील परंपरा. तब्बल पंधरा वर्षे सत्तेत राहिलेल्या या पक्षांच्या नेत्यांना जनतेनंही केवळ लाल दिव्याच्या गाडीतच बघितलेलं. मात्र, सत्ता गेल्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनी आपण सक्षम विरोधक असल्याचा साक्षात्कार दोन्ही पक्षांना झाला अन आक्रमक भाषेत भाषणं ठोकणाऱ्या नेत्यांचा अनुभव सातारकरांना आला. शुक्रवारचा दिवस आंदोलनाचाच ठरला. काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला तर राष्ट्रवादीनं मोर्चासोबतच रास्तारोको करून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुरती विस्कळीत करून टाकली. विशेष म्हणजे दोन माजी मंत्र्यांसह तब्बल नऊ आमदारांचा ताफा या आंदोलनाच्या निमित्तानं रस्त्यावर उतरला.
सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे शेतकरी अडचणीत आल्याचे सांगून आमदार शिंदे म्हणाले, ‘यांनी (भाजप सरकार) लहान मुलांची चिक्की सोडली नाही. चौथी पास माणूस राज्य कुशलतेने चालवू शकतो, हे वसंतदादा पाटील यांनी दाखवून दिलंय; मग यांना केवळ दाखवण्यासाठी बोगस डिगऱ्या कशाला लागतात? शेतकऱ्यांचे नेते म्हणविणारे राजू शेट्टी मंत्रिपदाच्या अपेक्षेत बसले आहेत. त्यामुळे त्यांच्या असुडाची वादी तुटली आहे. नाममात्र निधी देऊन सरकारने पाटबंधारे योजना जवळजवळ गुंडाळल्या आहेत. सातारचे मेडिकल कॉलेज आम्ही मंजूर केले. निधीचा प्रस्ताव, जागा सर्वकाही केले. पण ते कॉलेज अन्यत्र पळविण्याचा खटाटोप भाजपने चालविला आहे. त्यांच्यात ताकद नाही. पण आपण गाफील राहायचं नाही.’ महामार्गाच्या बाजूला ट्रॉलीवर राष्ट्रवादीचे पोस्टर आणि जीपवर चार मोठे कर्णे अशा थाटात ही ‘महामार्ग सभा’ वीस मिनिटे सुरू होती. नंतर पोलिसांच्या विनंतीवरून कार्यकर्ते महामार्गावरून बाजूला झाले आणि वाहतूक सुरळीत झाली. (प्रतिनिधी)
इथे ना खाकी, ना खादी!
४काँग्रेस कार्यकर्ते मोर्चाच्या तयारीत मग्न असताना काँग्रेस भवनासमोर एक छोटा अपघात झाला. ओव्हरटेक करताना एका तीनचाकी टेम्पोची धडक बसून दुचाकीवरील युवती रस्त्यात पडली. मोर्चानिमित्त कार्यकर्ते आणि पोलीस मोठ्या संख्येनं प्रवेशद्वारापाशी जमले होते; मात्र अपघातग्रस्त युवतीला मदतीचा हात दिला सामान्य माणसानेच. तिची दुचाकी उचलून दिल्यानंतर त्याने त्याच्या पाकिटातली ‘बँड-एड’ पट्टी जखमेवर लावली. युवती पोलिसांच्या जीपजवळ जाऊन हुज्जत घालू लागली. ‘एवढे पोलीस इथं असताना मला धडक देऊन टेम्पोवाला पळाला. मग काय उपयोग पोलिसांचा..?’ अशी तक्रार करता-करता अचानक तिचे डोळे भरून आले. अखेर एका पोलीस अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला टेम्पोविषयी ‘वॉकी-टॉकी’वरून संदेश पाठवायला सांगितले.
जीपखाली सापडला पाय
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महामार्गाकडे जाताना राष्ट्रवादीचा मोर्चा जिल्हा परिषदेजवळून सदर बझारकडे वळला. घोषणा देणाऱ्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यावेळी उघड्या जीपच्या बॉनेटवर बसून स्वत: हातात माईक घेऊन घोषणा देत होते. जिल्हा परिषदेच्या वळणावर एक कार्यकर्ता धक्का लागून खाली पडला आणि आमदार शिंदे ज्या जीपवर होते, त्याच जीपचे चाक या कार्यकर्त्याच्या पायावरून गेले. इतर कार्यकर्त्यांनी तातडीने रिक्षा बोलाविली आणि जखमी कार्यकर्त्याला रुग्णालयात घेऊन गेले.
गजी पथकाचा समावेश
जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन मोर्चा महामार्गाकडे वळला, तेव्हा जिल्हा न्यायालयाच्या इमारतीसमोरच्या चौकात माण तालुक्यातून खास मागविलेले गजीनृत्य पथक मोर्चात सहभागी झाले. महामार्गावर मोर्चा १ वाजून ३८ मिनिटांनी पोहोचला, तेव्हा रस्त्याची एक बाजू गजी पथकानेच रोखून धरली आणि महामार्गावरच सवाद्य नृत्य केले.
हे घड्याळ पवारांचंच!
आमदार शशिकांत शिंदे यांचे भाषण लांबत चालले, तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनी दुरून त्यांना घड्याळ दाखवून खाणाखुणा सुरू केल्या. यावर शिंदे म्हणाले, ‘पोलीस मघापासून मला घड्याळ दाखवू लागले आहेत. हे घड्याळ पवारांचं आहे आणि हा जिल्हाही पवारांच्याच विचारांचा आहे.’
जॉनी, जॉनी... येस पापा!
राष्ट्रवादीच्या मोर्चात ‘जॉनी, जॉनी... येस पापा!’ या इंग्रजी बडबडगीताच्या चालीवर घोषणा देण्यात आल्या. ‘पंकजा पंकजा, येस पापा... इटिंग चिक्की, येस पापा’, ‘विनोद विनोद, येस पापा... बोगस डिगरी, येस पापा’, ‘लोणीकर लोणीकर, येस पापा... दोन बायका, येस पापा’ अशा घोषणा देण्यात आल्या.
पोपटासारखे बोलणारे मोदी भ्रष्टाचारात गप्प का? : पृथ्वीराज
सातारा : भाजप-सेनेच्या कारभारावर ताशेरे ओढताना काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावरही हल्लाबोल केला. शुक्रवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात ते बोलत होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पहिले सहा महिने आम्ही महाराष्ट्रातील भाजप सरकारला काम करू दिलं. आरोप प्रत्यरोप केले नाहीत. कारण ही नवी माणसे आहेत. प्रशासनाचा अनुभव नाही. त्यामुळे प्रशासन कसं चालतं, अधिकारी कुठे नेमायचा, कुठे बदल्या करायच्या, याची काही माहिती नसते. म्हणून आम्ही सहा महिन्याचा त्यांना अवधी दिला. नवीन सरकार आहे. त्यांना काम करायला वेळ दिला पाहिजे. म्हणून विधी मंडळात त्यांना काम करू दिलं. परंतु त्यांनी निवडणुकीपुर्वी जी-जी आश्वासने दिली होती. पंधरा दिवसात पुर्ण करतो, महिन्याभरात पुर्ण करतो, अशी आश्वासद देऊन हे सरकार सत्तारुढ झाल होतं. पण दिवसेंदिवस आम्ही पाहातोय, एका बाजुला शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती झालीयं.
चव्हाण पुढे म्हणाले, सोयाबीनचे, कापसाचे दर विदर्भात कोसळलेले आहेत. ऊस उत्पादक शेतकरी इतिहासात कधी नव्हता एवढा पिचलेला आहे. आज साखरेचे दर उतरेल. महाराष्ट्रातील एकही कारखाना एफआरपीचा दर देऊ शकला नाही. दूध उत्पादन शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे. २५ रुपयेकडे दूधाचे भाव असताना आज १६ रुपयेकडे भाव आलेले आहेत. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी पेटून उठलेला आहे. वीज माफी करा म्हणून सांगितलं. तर ज्येष्ठ मंत्री म्हणतायत, शेतकऱ्याकडे मोबाइल धरायला पैसे आहेत मग वीज बिल का भरत नाहीत. आणि शेवटी त्यांनी सांगितलं आम्हाला काही करता येणार नाही. अशा प्रकारचं निष्ठूर सरकार काय कामाचं. काळा पैसा आणू, प्रत्येकाला पंधरा लाख रुपये देऊ, बँकेतील खाते उघडायला लावले. पंधरा लाख काय, पंधरा पैसेही कुणाला मिळाले नाहीत, किंवा आणले नाहीत. असाही त्यांनी आरोप केला.
सर्वात मोठा काळा पैशाचा तस्कर ललीत मोदी याच्यावर भारत सरकारने २१०० कोटीची मनी लाँड्रींगची केस घातलेली आहे. त्याला आणण्याऐवजी परराष्ट्रमंत्री गुप्त वार्तालाप करतात. या मोंदीना काही मदत करू नका म्हणून चिदंबरम यांनी दोन दोन पत्र लिहून जर ललीत मोदीला मदत कराल तर आपल्या देशाचे संबंध बिघडतील. असे सांगितले होते.
मात्र परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्या ललित मोदीला जगात कुठेही फिरू द्या, असे सांगितलं. भारतामध्ये त्याचा पासपोर्ट रद्द केला होता. आणि सुषमा स्वराज यांना माहिती आहे, पासपोर्ट रद्द का केला जातो. पासपोर्ट गुन्हेगाराचा रद्द होतो. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि ललीत मोदींचे काय आर्थिक संबंध आहेत, हे उघड झाले आहे. त्या मोदीला मदत करण्यासाठी लेखी पत्र दिले आहे, स्वत:च्या सहीचे. त्यामध्ये लिहिलय, मी गुन्हेगाराला मदत करतेय हे भारत सरकारला कळू देऊ नका. त्यामुळे मोदी काही चकार शब्द काढत नाहीत. आमची मागणी आहे. मोदींनी जाहीर सांगावं आम्ही काहीच चूक केली नाही. पळपूटा गुन्हेगार आहे. त्याला मदत केली अशी काही चूक झाली नाही, अस तरी सांगा किंवा दोघींच्याविरोधात कारवाई तरी करा. शिक्षणाचा बट्याबोळ कसा झालाय बघा. केंद्रीय शिक्षणमंत्री २००४ च्या शपथपत्रात म्हणतायत मी बीए आहे. २००९ ला म्हणतायत नाही मी बीकॉम पहिल्या वर्षात आहे. परत म्हणतायत बीए पहिल्या वर्षात आहे. आज या लोेकांची शिक्षणमंत्री म्हणून निवड होेते. हे आश्चर्य आहे. (प्रतिनिधी)
शिक्षणाचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न
महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यानीही परदेशवाऱ्या करण्यास काही हरकत नाही. पण किती वाऱ्या कराव्यात. सहा सात महिन्यांमध्ये सात परदेशवाऱ्या. त्यांचे उदिष्ट काय ? महाराष्ट्र मंडळाच्या उद्घाटनासाठी जायचं. म्हणूनच महाराष्ट्रातील जनता आज पेटून उठली आहे. पहिली आमची मागणी आहे. शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली पाहिजेत. शिक्षणाचं भगवेकरण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. कोण नियुक्त केलंय जातंय. कुणाला हटवलं जातंय, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
शिंदेंनी दाखवली चिक्की!
सातारा : राष्ट्रवादीच्या रास्तारोको आंदोलनात सर्वाधिक चर्चा झाली मुख्यमंत्र्यांची परदेशवारी अन् पंकजा पालवे-मुंडेंची चिक्की. विशेष म्हणजे पोलीस व्हॅनमध्ये बसल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी चक्क चिक्कीचे पाकिट खिडकीतून बाहेर काढून प्रसारमाध्यमांना दाखविले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर कार्यालयाचे प्रवेशद्वार पोलिसांनी बंद केले. आ. शशिकांत शिंदे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, सुनील माने, अनिल देसाई, अॅड. नितीन भोसले यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील रस्त्यावर उभ्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरुच ठेवली होती.
सातारा जिल्ह्याची अस्मिता ठरलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी राष्ट्रवादीने जमीन उपलब्ध करुन दिली. निधीची तरतूदही केली. त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने वैद्यकीय महाविद्यालय स्थलांतरित करण्याचा डाव आखला आहे. जे सरकार बोगस पदवी व चिक्की घोटाळा करत आहे, ते सरकार काहीही करु शकते, अशी धारणा जनतेची झालेली आहे, असा आरोप राष्ट्रवादीनं केला.
शेतकऱ्यांच्या ऊसाला तसेच दूधाला योग्य भाव मिळालाच पाहिजे व कृषी विषयक शेतीपंपांसह इतर लघुउद्योगाला संपूर्ण वीज बील माफी मिळाली पाहिजे, जलशिवारयुक्त गाव योजनेला गती दिली पाहिजे, अन्य सुरक्षा अंत्योदय योजना व दारिद्र्य रेषेखालील लोकांचे फेरसर्वेक्षण करुन यादी त्वरित जाहीर झाली पाहिजे, जिहे कटापूर, उरमोडी, वसना-वांगना, वांग-मराठवाडी, कवठे-केंजळ, हणबरवाडी-धनगरवाडी, महू-हातगेघर व नियोजित बोंडरवाडी व इतर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तसेच स्थानिकांच्या पुनर्वसनासाठी निधीची तरतूद झाली पाहिजे, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)