कॉँग्रेस-राष्ट्रवादीची जुगलबंदी
By admin | Published: July 23, 2016 11:24 PM2016-07-23T23:24:32+5:302016-07-23T23:46:57+5:30
नागरी समस्यांचे वेध : राजकीय फडात रंगत; तरुण कार्यकर्ते उत्साही--खंडाळा -नगरपंचायत -राजकारण
खंडाळा : नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या प्रमुखांनी कंबर कसली आहे. विशेषत: तरुण कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले आहेत. लहान-मोठ्या नागरी समस्यांचा शोध घेऊन ते सोडविण्याची स्पर्धाच खंडाळ्यात लागली आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची चांगलीच जुगलबंदी रंगली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
तालुक्याचे ठिकाण असल्याने खंडाळ्याची नगरपंचायत जाहीर झाली. पहिल्या निवडणुकीसाठीचा बिगुल वाजल्याचे सर्वपक्षीय तरुणांमध्ये उत्साह संचारला आहे. नगरसेवक आरक्षणे आणि प्रभाग रचना निश्चित झाल्यामुळे आपल्या प्रभागांमध्ये इच्छुकांनी दंड थोपटले आहेत. विशेषत: अनेक वर्षे सत्तारुढ असलेल्या कॉँग्रेसने आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी तरुणांची मोठी फळी तयारीच्या मैदनात उरली आहे, तर प्रत्येकवेळी संघर्षाचा पाढा वाचणाऱ्या राष्ट्रवादीने यावेळी पहिल्यापासूनच सतर्क राहून जोरदार तयारी करण्यासाठी दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना ताकद दिली आहे.
खंडाळा नगरपंचायतीच्या फडात निर्णायक कुस्ती करण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणीला भलताच वेग आला आहे. नगरपंचायतीचे मैदान मारण्यासाठी कराव्या लागणाऱ्या लढाईसाठी समस्यांना शस्त्र बनवले गेले आहे. त्यामुळे नागरी समस्यांचा उठाव झाला असून, प्रशासनापर्यंत लोकांची भूमिका मांडण्याचे काम कार्यकर्त्यांनी हाती घेऊन पक्षीय ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
काँग्रेसचे ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष बावकर यांच्या नेतृत्वाखाली सदस्य स्वप्नील खंडागळे, दीपक सूर्यवंशी, दत्तात्रय गाढवे, अनिल गाढवे, राजेंद्र चव्हाण, विशाल गोळे या कार्यकर्त्यांनी खंडाळ्यात घरगुती गॅस वितरणामध्ये लोकांना अडचणी येत आहेत. गॅस वितरकांकडून अतिरिक्त पैसे घेऊनही घरापर्यंत गॅस पोहोचविला जात नसल्याबाबतचे निवेदन तहसील कार्यालयात दिले. तर राष्ट्रवादीचे औद्योगिक सेल अध्यक्ष शैलेश गाढवे, शहराध्यक्ष प्रशांत गाढवे यांच्या नेतृत्वाखाली दयानंद खंडागळे, केतन देशमुख, प्रवीण गाढवे, आशिष गाढवे या कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते शासकीय विश्रामगृहापर्यंतच्या रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्याने मोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तेथे मुरूम टाकून साईडपट्ट्या तातडीने भरून घेण्याबाबतचे निवेदन दिले. त्यामुळे दोन्ही काँग्रेसने नगरपंचायतीच्या मैदानावर आपले पिच भक्कम बनविण्यासाठी जोरदार तयारी चालवली आहे. याची चर्चा सध्या शहरात जोरदार सुरू आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबरच नगरपंचायतीच्या निमित्ताने शिवसेनेने पक्षीय बैठका घेऊन तयारीचे रणशिंग फुंकले आहे. सेनेच्या तरुण कार्यकर्त्यांनीही संपर्क सुरू केला आहे. त्यामुळे राजकीय हालचालींनी वातावरण तापत आहे. (प्रतिनिधी)