काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा जोर ग्रामस्थांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:38 AM2021-07-31T04:38:26+5:302021-07-31T04:38:26+5:30
वाई : ज्या वाटेने प्रशासनही वाई तालुक्यातील पश्चिम भागातील जोर गावात पोहोचू शकले नाही, त्याच वाटेने जिवाची पर्वा ...
वाई : ज्या वाटेने प्रशासनही वाई तालुक्यातील पश्चिम भागातील जोर गावात पोहोचू शकले नाही, त्याच वाटेने जिवाची पर्वा न करता अडचणीत असलेल्या जोर ग्रामस्थांच्या मदतीसाठी सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे व त्यांचे युवक काँग्रेसचे पथक जोरमध्ये मदतकार्यासाठी पोहोचले.
वाई तालुक्यातील जोर येथे सोमवार, २६ रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी दौरा केला. प्रशासनाची कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही, असे ग्रामस्थांनी फोन करून विराज शिंदे व बापूसाहेब शिंदे यांना सांगितले. या दोघांनी लगेच निर्णय घेतला. काहीही झाले तरी आपल्या अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी जायचेच. तब्बल बारा ते तेरा किलोमीटर भर पावसात पायपीट करत चिखल तुडवत, त्यामध्ये वरून पडणारा धो-धो पाऊस, वाहून गेलेले तेरा पूल, ओढ्यातून धो-धो वाहणाऱ्या पाण्यामधून, तुटलेल्या रस्त्यांवरून वाट काढत विराज शिंदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब शिंदे तसेच इतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह जोर येथे पोहोचले. पाच दिवस झाले एक महिला व तिचा मुलगा अतिवृष्टीमुळे वाहून गेले आहेत. अजूनही ते बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले व धीर दिला. यावेळी सर्व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
यावेळी वाई तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवी भिलारे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद अनपट, गणेश शिंदे, विकास जाधव, समीर जाधव, सुरेश वाघ, सनी शिंदे, संजय जाधव, गणेश जाधव, ज्ञानदेव कोंढाळकर, शिवाजी राऊत, निशांत म्हेत्रे, जोतिराम भोसले व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.