काँग्रेसकडून आयुर्वेद संपविण्याचे काम: मोदींमुळे आयुर्वेदाला अच्छे दिन- CM प्रमोद सावंत
By शीतल पाटील | Published: November 30, 2023 09:02 PM2023-11-30T21:02:19+5:302023-11-30T21:02:27+5:30
सांगलीतील बापट बाल मंदिर शाळेजवळील चौकाला वैद्यराज आ. वा. दातारशास्त्री चौक नामकरण सोहळा मुख्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत झाला.
सांगली : भारतात आयुर्वेदाची मोठी परंपरा आहे. इंग्रजांच्या काळात आयुर्वेद संपविण्याचे काम झाले. त्यानंतर गेल्या ६० वर्षात काँग्रेस राजवटीतही आयुर्वेदाबाबत फारसे प्रयत्न झाले नाहीत. देशात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आयुर्वेदाला अच्छे दिन आले, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी सांगलीत केले.
सांगलीतील बापट बाल मंदिर शाळेजवळील चौकाला वैद्यराज आ. वा. दातारशास्त्री चौक नामकरण सोहळा मुख्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते. डाॅ. सावंत म्हणाले की, आयुर्वेदाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. मोदीमुळे आयुर्वेदाला अच्छे दिन आले. आयुष मंत्रालय स्थापन केले. दिल्लीत आयुर्वेद एम्स सुरू केले. इंग्रजांनी आयुर्वेद संपविण्याचे काम केले. काँग्रेसनेही आयुर्वेद जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.
आता जगाला आयुर्वेदाचे महत्व कळले आहे. १४० देशात आयुर्वेद व योगा पोहोचला आहे. आयुर्वेद वैद्यांना विदेशातही प्रॅक्टीस करण्यास मान्यता मिळाली. कोरोनानंतर आयुर्वेदाचे महत्व वाढले. वेलनेस टुरिझममध्येही आयुर्वेदला महत्व आहे. परदेशातून अनेकजण आयुर्वेदिक उपचारासाठी देशात येत आहेत. त्यामुळे वैद्यांनी वेलनेस टुरिझमकडेही लक्ष द्यावे.दातारशास्त्रींनी पाच भौतिक चिकित्सा पद्धती उदयास आणली. गुरू-शिष्य परंपरेतून ही पद्धती पुढील पिढीत रुजली आहे. त्यांचे कार्य सुरु ठेवण्याचे काम आयुर्वेद व्यासपीठाकडून केले जात आहे.
तीन राज्यात भाजपची सत्ता
पाच राज्याच्या निवडणुका पार पडल्या. यापैकी तीन राज्यात भाजपची सत्ता येईल. तर दोन राज्यात भाजपची स्थिती चांगली असेल, असा दावाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केला.