उत्तरेत काँग्रेस एकवटल्या पण भाजपची लक्षवेधी कामगिरी; शशिकांत शिंदेंना अल्प मताधिक्य

By प्रमोद सुकरे | Published: June 5, 2024 10:45 PM2024-06-05T22:45:36+5:302024-06-05T22:46:03+5:30

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ, राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटलांवर आत्मचिंतनाची वेळ

Congress united in North but BJP's impressive performance; Shashikant Shinde has a small margin of votes | उत्तरेत काँग्रेस एकवटल्या पण भाजपची लक्षवेधी कामगिरी; शशिकांत शिंदेंना अल्प मताधिक्य

उत्तरेत काँग्रेस एकवटल्या पण भाजपची लक्षवेधी कामगिरी; शशिकांत शिंदेंना अल्प मताधिक्य

कराड - सातारा लोकसभा मतदारसंघाचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले विजय झाले. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारापेक्षा राष्ट्रवादीच्या उमेदवाराने १ हजार ७२४ मते जादा घेतली असली तरी दोन्ही काँग्रेस एकवटूनही त्यांना मिळालेले अत्यल्प मताधिक्य विद्यमान आमदारांसाठी धोक्याची घंटा असून त्यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे असेच म्हणावे लागेल.

कराड तालुका हा सातारा जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथे पहिल्यापासूनच कराड दक्षिण व उत्तर असे विधानसभेचे दोन मतदारसंघ आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात कराड, सातारा ,कोरेगाव व खटाव या चार तालुक्यातील मतदारांचा समावेश असल्याने हा मतदारसंघ किचकट म्हणून पाहिला जातो.

कराड उत्तर मतदार संघातून आजवर काँग्रेस विचाराच्या उमेदवारानेच नेतृत्व केले आहे. तर विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील सलग  ५  वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. सध्या मात्र भाजप कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मतदारसंघात बरेच हातपाय पसरल्याचे या निकालाने स्पष्ट झाले आहे. मनोज घोरपडे यांनी मतदारांशी ठेवलेला सततचा संपर्क, तळागाळापर्यंतच्या लोकांना शासनाच्या योजना पोहोचवण्याचे केलेले काम या साऱ्याचे फळ या निकालात दिसत आहे.

कराड उत्तर मतदार संघात उदयनराजे भोसले यांच्या सातारा तालुक्यातील वर्णे व नागठाणे या २ जिल्हा परिषद गटांचा समावेश होतो. तसेच आमदार शशिकांत शिंदे यांच्या कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली जिल्हा परिषद गट व रहिमतपुर नगर परिषदेचा समावेश याच मतदारसंघात होतो. त्यामुळे हा मतदारसंघ दोघांचेही बलस्थान म्हणून पाहिला जात होता.येथे दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी २ लाख ९६ हजार ९४५ मतदार होते. पैकी १लाख ९४ हजार २९ म्हणजे ६५.३४ % मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पैकी खासदार उदयनराजे भोसले यांना ८८ हजार ९३० तर आमदार शशिकांत शिंदे यांना ९० हजार ६५४ मते मिळाली. याशिवाय इतर उमेदवारांनी घेतलेली मते वेगळीच .पण शशिकांत शिंदे यांनी १ हजार ७२४ मतांची आघाडी येथे घेतली आहे.

विरोधकांना आला ताकदीचा अंदाज

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात बऱ्याचदा तिरंगी लढती होत आल्या आहेत. त्यामुळे मत विभाजनाचा फायदा होऊन आमदार बाळासाहेब पाटील यांनी नेहमीच विधानसभेला बाजी मारली आहे. मात्र या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील विरोधक एकवटले होते. भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन केलेल्या प्रयत्नामुळे गत लोकसभा निवडणुकीला सुमारे ५० हजाराचे मताधिक्य राष्ट्रवादी उमेदवाराला घेणाऱ्या बाळासाहेब पाटलांना यावेळी फक्त १ हजार ७२४ मताधिक्यावर येऊन थांबावे लागले आहे. बाळासाहेबांसाठी ही धोक्याची घंटा तर आहेच. पण विरोधकांना आपल्या सामुदायिक ताकदीचा अंदाज या निमित्ताने आला आहे असे म्हटले जात आहे.

Web Title: Congress united in North but BJP's impressive performance; Shashikant Shinde has a small margin of votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.