कॉँग्रेस कार्यकर्ते भेटले नांदेडच्या चव्हाणांना!
By admin | Published: July 14, 2017 11:01 PM2017-07-14T23:01:22+5:302017-07-14T23:01:22+5:30
कॉँग्रेस कार्यकर्ते भेटले नांदेडच्या चव्हाणांना!
लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : सातारा जिल्ह्यातील काँग्रेसअंतर्गत वाद आता चांगलाच चिघळू लागला आहे. जिल्हाध्यक्ष बदल, हेच त्यामागील मुख्य कारण सांगितलं जातंय. या संदर्भातच जिल्ह्यातील काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपले गाऱ्हाणे माजी मुख्यमंत्री चव्हाणांना भेटून मांडले; पण हा ‘दरबार’ कऱ्हाडच्या नव्हे तर नांदेडच्या चव्हाणांचा होता, एवढंच. गेल्या दोन दिवसांपासून याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्यात उलटसुलट चर्चा तर होणारच.
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी सातारा जिल्ह्याची ओळख होती. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर येथील बुरुज ढासळले. ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करताना काँग्रेसची पुरती दमछाक होताना दिसतेय. गत पंचवार्षिकमध्ये दिल्लीच्या राजकारणात रममाण असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना अनपेक्षितपणे राज्याच्या मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली.
स्वच्छ प्रतिमेच्या पृथ्वीबाबांनी आपल्या कामाची चुणूकही दाखवून दिली. त्यामुळे सातारा जिल्ह्यात काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येतील, असे कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र, राष्ट्रवादीच्या ‘घड्याळा’नेच जिल्ह्यात बाजी मारली. त्यावेळपासून जिल्ह्यात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करायचे असेल तर विशेष प्रयत्न करण्याची गरज अनेकांनी बोलून दाखविली आणि त्याचाच एक भाग म्हणून सत्तेत नसणाऱ्या काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष हा आक्रमक असला पाहिजे, असा सूर काहींनी आळवला.
कऱ्हाडचे आनंदराव पाटील गत पंधरा वर्षे काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सांभाळत आहेत. राष्ट्रवादीची मोठी ताकद जिल्ह्यात असताना आनंदराव पाटील यांनी काँग्रसचे विचार रुजविण्यसाठी प्रयत्न तर केले आहेतच. त्याचीच पोहोचपावती म्हणून नानांना विधानसभेची आमदारकी मिळाली आहे. साहजिकच जिल्ह्याच्या राजकारणात नानांना मानणारा मोठा वर्ग आहे. अलीकडच्या काही वर्षांत मात्र आनंदरावनानांच्या जिल्हाध्यक्ष पदाला पक्षातीलच काही मंडळींनी विरोध चालविलाय.
त्यांना आक्रमक नेतृत्व असणाऱ्या जयाभाऊंचा ‘भाव’ जिल्हाध्यक्ष पद देऊन आणखी वाढवायचा आहे. गोरेंना जिल्हाध्यक्ष पद दिल्यास काँग्रेसला बरे दिवस येतील, अशी धारणा असणाऱ्या अनेकांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोरही ही बाब अनेकदा ठेवल्याचे बोलले जाते. मात्र, पृथ्वीबाबांनी याबाबतची आपली भूमिका अद्याप तरी कोठेच स्पष्ट केल्याचे दिसत नाही.
सध्या राज्यभर काँगेसच्या पदाधिकारी निवडीचा पक्षांतर्गत कार्यक्रम राबविला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सभासद नोंदणी अभियानही नुकतेच पार पडले आहे. आॅगस्ट महिन्यात या निवडणुका होतील, असे बोलले जाते. त्यामुळे काँग्रेस अंतर्गत दोन्ही गट सक्रिय झाले असून, जिल्हाध्यक्ष पदासाठी त्यांनी कंबर कसली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आमदार जयकुमार गोरे, कऱ्हाड उत्तर काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम, जिल्हा परिषद सदस्य भीमरावकाका पाटील यांच्यासह एका शिष्टमंडळाने नुकतीच मुंबईत प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्याचे फोटो गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
जिल्हाध्यक्ष निवडीची प्रतीक्षा
सातारा जिल्हा हा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जिल्हा आहे. येथील काँगे्रसअंतर्गत प्रश्न त्यांनीच पुढाकार घेऊन सोडविणे अपेक्षित आहे. मात्र, गत महिन्यात सातारा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात सांगली जिल्हा काँग्रेसचे नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांनी सातारा जिल्ह्यात काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष बदलण्याची गरज व्यक्त करीत, मी जयकुमारला जिल्हाध्यक्ष करण्यासाठी आग्रही असल्याचा ‘बॉम्ब’ टाकला होता. त्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याने भरच पडली आहे. जिल्हाध्यक्ष निवड होईपर्यंत आणखी काय काय घडणार, हे येणारा काळच ठरवेल.