काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून कामाला लागावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:26 AM2021-06-26T04:26:36+5:302021-06-26T04:26:36+5:30
सातारा : ज्या सातारा जिल्ह्याने महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने दोन ...
सातारा : ज्या सातारा जिल्ह्याने महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने दोन मुख्यमंत्री दिले, त्या सातारा जिल्ह्यात काही अपवाद सोडले तर काँग्रेस पक्ष मजबूत आहे. जिल्ह्यात काँग्रेसला आणखी मजबूत करायचे असेल तर सर्वानी आपले मतभेद विसरून काँग्रेसला मजबूत व प्रबळ बनवू या, असे आवाहन सातारा जिल्ह्याचे प्रभारी संजय बालुगडे यांनी केले.
सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सातारा जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस कार्याध्यक्ष विजयराव कणसे, प्रदेश प्रतिनिधी अजित पाटील-चिखलीकर, रणजित देशमुख, रजनीताई पवार, बाबासाहेब कदम, धनश्री महाडिक, नरेश देसाई, विराज शिंदे, झाकीर पठाण, मनोजकुमार तपासे, प्रतापराव देशमुख व मुकेश मोहिते इतर पदाधिकारी उपस्थित होते.
संजय बालुगडे म्हणाले की, सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला ‘स्व. यशवंतराव चव्हाण व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा)’ यांच्या रूपाने दोन मुख्यमंत्री दिले त्या सातारा जिल्ह्यात आगामी काळात आपण सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जिल्ह्यात काँग्रेसला गतवैभव आणायचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यानी आप-आपसातील असणारे मतभेद दूर करून काँग्रेस पक्षवाढीसाठी काम करावे. काँग्रेस एक कुटुंब असून सर्वानी एकदिलाने काम करावे.
जिल्हाध्यक्ष डॉ. जाधव म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील माण, कोरेगाव, सातारा शहर, सातारा व फलटण तालुक्यातील कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येतील. जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यानी आप-आपल्या तालुक्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत व जिल्ह्यातील काँग्रेस आपण सर्वानी बळकट करू यात, असे आवाहन केले.
या वेळी जिल्हा निरीक्षक संजय बालुगडे यांनी जिल्ह्यातील ११ तालुकाध्यक्षांसोबत स्वतंत्रपणे चर्चा करून पक्षवाढीसाठी मार्गदर्शन केले. माण, कोरेगाव, फलटण, सातारा शहर व सातारा तालुक्याच्या कार्यकारिणी निवडीविषयी प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली.
या जिल्हा आढावा बैठकीस उपाध्यक्ष चंद्रकांत ढमाल, विष्णुबाळा अवघडे, विश्वंभर बाबर, एम. के. भोसले, विवेक देशमुख, डॉ. महेश गुरव, भीमरावकाका पाटील, श्रीकांत चव्हाण, अविनाश फाळके, मनोहर बर्गे, आनंदराव जाधव, सुषमा राजेघोरपडे, दत्तात्रय धनावडे, उमेशराव साळुंखे, निवासराव थोरात, अजित जाधव, विक्रम तरडे, महेंद्र बेडके-सूर्यवंशी, रवींद्र भिलारे, नंदकूमार बावळेकर, पांडुरंग यादव, अभिजीत पाटील, एस. वाय. पवार, दादासो काळे, डॉ. संतोष कदम, माधुरीताई जाधव, नकुसा जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळ : सातारा येथील काँग्रेस कमिटीमध्ये शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये संजय बालगुडे यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.