काँगे्रसने पंचमहाभुतेही खाल्ली!
By admin | Published: May 29, 2015 09:59 PM2015-05-29T21:59:31+5:302015-05-29T23:46:44+5:30
जावडेकरांचा घणाघात : मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मांडला तुलनात्मक आढावा
सातारा : काँगे्रस सरकारने कोळसा, जमीन , टू जी स्पेक्ट्रम असे घोटाळे करुन पंचमहाभूतांनाही खाऊन टाकले आहे. घोटाळ्यांचे आॅलिम्पिक रेकॉर्ड करण्यासाठी काँगे्रसच्या सरकारमध्ये चढाओढ लागली होती, असा घणाघात पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी साताऱ्यात केला. मोदी सरकारने वर्षभराच्या कालखंडात केलेल्या लोकोपयोगी कामांची जंत्रीही त्यांनी यावेळी मांडली.केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात सरकारने केलेल्या लोकोपयोगी कामांची माहिती देण्यासाठी येथील श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत जावडेकर बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. भरत पाटील, माजी आमदार कांताताई नलावडे, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, माजी नगरसेवक किशोर गोडबोले यांची व्यासपीठावर उपस्थित होती.
दिल्लीपासून आपलं कथापुरान सुरु करत असल्याचं म्हणत जावडेकरांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘काँगे्रसने १४0 कार्पोरेट कंपन्यांना १७00 कोटी टन कोळसा फुक्कट दिला.
आपल्या देशात रेशन फुक्कट मिळत नाही, त्या ठिकाणी हा निर्णय घेतला गेला. आमच्या सरकारनं देशातील २00 खाणींपैकी ३७ कोळसा खाणींचा लिलाव करुन सरकारच्या तिजोरीत ३ लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा केली. पंतप्रधान मनमोहन सिंग होते, पण सर्व अधिकारी सोनिया गांधी व राहूल गांधींकडे होते. त्यांच्या सरकारने २ जी स्पेक्ट्रम घोटाळा
केला.
याचा फेरलिलाव करुन भाजप सरकारने १ लाख ९ हजार कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा केले. सीडब्ल्यूजी चा ६५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला. खेळाच्या मैदानातही त्यांनी घोटाळे केले. जिजाजी-दामाद घोटाळाही मधल्या काळात गाजला. सरकारचे वजन वापरुन काँगे्रसने ‘जावयांना’ ८ कोटींना जमीन दिली. तीच जमीन जावयाने ५८ कोटी रुपयांना
विकली.’
देश वाचला तर पर्यावरण वाचेल, या धोरणानुसार संरक्षण खात्याच्या ६ हजार किलोमीटर चा रस्ता तयार करण्याच्या प्रस्तावाला भाजपने ६ दिवसांत मंजुरी दिली. गॅसची सबसिडी खात्यावर जमा करण्यात येत असल्याने काळाबाजार थांबला. तसेच देशातील ५ लाख लोकांनी सबसिडी नाकारली. ती सबसिडी गरिबांना देण्यात येत आहे. प्रधानमंत्री जीवनसुरक्षा योजना, अटल पेन्शन योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना संरक्षणाचे कवच दिले. अटल पेन्शन योजनेत ८ कोटी लोकांनी प्रिमिअम भरला. (प्रतिनिधी)
भाजपमधील फूट उघड
भाजपच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे निरोप पदाधिकाऱ्यांनाही दिले गेले नव्हते. याबाबत भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष सुनील काळेकर यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे भाजपमधील फूट उघडपणे समोर आली.