कोनाड्यातील अशोकस्तंभाला अठरा वर्षानंतर झळाळी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:21 PM2018-02-11T23:21:18+5:302018-02-11T23:21:23+5:30
सातारा : गेली अठरा वर्षे पोलीस मुख्यालयाच्या कोनाड्यात धूळखात पडलेल्या पितळी अशोक स्तंभाला आता झळाळी मिळणार आहे. पोलीस मुख्यालयासमोरील प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या बागेत सुमारे पंधरा फूट उंचीवर हा अशोक स्तंभ मोठ्या दिमाखात झळकणार आहे.
सध्या जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालय परिसराचे सुशोभिकरण कार्य युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. अठरा वर्षांपूर्वी रायफलमधील पितळी पुंगळ्यांचा वापर करून तयार करण्यात आलेला हा अशोकस्तंभ एका खोलीतच पडून होता. पोलीस मुख्यालयातील स्वच्छता मोहिमेवेळी हा अशोक स्तंभ स्वच्छपणे पुसून बाहेर आणण्यात आला. तेव्हा त्याची चकाकी लक्ष वेधून घेणारी होती. कधी काळी पोलीस खात्याकडून मोठ्या कष्टाने बनविण्यात आलेल्या या अशोक स्तंभाला अत्यंत चांगली जागा बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हा स्तंभ पोलीस मुख्यालय इमारत समोरील हिरवळीत उभा करण्यात येणार आहे. तसेच प्रवेशद्वाराच्या दुसºया बाजूला असलेल्या हिरवळीत ‘महाराष्ट्र पोलीस’ हा लोगोही पितळी धातूने बनवून घेऊन बसविला जाणार आहे.
त्यानंतर या दोन्ही ठिकाणी आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यामुळे शतकोत्तर पोलीस मुख्यालय इमारतीचा
दर्शनी भाग अधिकच झळाळणार आहे.
तब्बल ६५ किलो वजन..
पोलीस खात्याच्या रायफलमधून वापरण्यात आलेल्या पुंगळ्या वितळवून हा अशोकस्तंभ बनविण्यात आला आहे. सुमारे अडीच फूट उंचीचा हा भरीव स्तंभ तब्बल ६५ किलो वजनाचा आहे. पंधरा फूट उंचीच्या खांबावर हा अशोक स्तंभ बसवून रस्त्यावरून येणाºया-जाणाºया प्रत्येक सातारकराला व्यवस्थित दिसावा, याचेही नियोजन पोलीस खात्याने केले आहे. दरम्यान, ‘महाराष्ट्र पोलीस’ लोगोचा पुतळा हरियाणातील एका कारखान्यातून बनविला जाणार असून, यातही पुंगळ्या वापरल्या जातील.