प्रतापगडाच्या कोसळलेल्या तटबंदीचे सह्याद्री प्रतिष्ठानकडून संवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:43 AM2021-05-20T04:43:01+5:302021-05-20T04:43:01+5:30
सातारा : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडाच्या तटबंदी बुरुजाखालील भाग गतवर्षी पावसाळ्य़ात कोसळला होता. यामुळे भविष्यात तटबंदी आणि गडाला ...
सातारा :
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडाच्या तटबंदी बुरुजाखालील भाग गतवर्षी पावसाळ्य़ात कोसळला होता. यामुळे भविष्यात तटबंदी आणि गडाला धोका पोहोचून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास धूरस होण्याची भीती होती. यामुळे सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने सर्व परवानग्या, खासदार उदयनराजे भोसले, राजमाता कल्पनाराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सहकार्य आणि सहमती घेऊन केवळ ९४ दिवसांत अत्यंत जोखमीचे संवर्धनाचे काम पूर्ण केले. त्यामुळे राज्यात इतर ठिकाणी होत असलेली किल्ल्यांची पडझड आणि रखडलेल्या दुरुस्तीच्या कामांसाठी हे एक चांगले उदाहरण ठरले आहे.
गतवर्षी पावसाळ्य़ात जून महिन्याच्या सुरुवातीला प्रतापगडाच्या तटबंदीच्या पायाखालील भागाचे भूस्खल्लन झाल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्य़ांना मिळाली. अन् मावळ्यांच्या डोळ्य़ांत अश्रू तरळले. सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमंगुंडे हे शिवभक्तांसह गडावर पोहोचले अन् त्यांनी तेथेच प्रण केला. अन् कार्याला सुरुवात झाली.
सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळ्यांनी हाती घेतले संवर्धनाचे कार्य.
जून २०२० मध्ये सह्याद्री प्रतिष्ठानच्या बैठका पूर्ण झाल्यानंतर साताऱ्यात खासदार उदयनराजे आणि राजमाता कल्पनाराजे तसेच आमदार शिवेंद्रराजे यांचे सहकार्य घेऊन मोहिमेची पुढची घोडदौड कायम ठेवली. पुरातत्व विभागाची परवानगी महत्त्वाची असल्याने पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास व्हाळे आणि डॉ. तेजस गर्दे यांनी परवानगी दिली. त्यानंतर वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी परवानगी दिली आणि कामाला सुरुवात झाली. गडावर साहित्य घेऊन जाणे आणि तेथून दरीत उतरविणे धोकादायक होते. या परिस्थितीतही पायाड बांधून साहित्य दरीत उतरविण्यात आले आणि कितीही अडचणी आल्या तरी दर्जेदार आणि मजबूत काम करण्यात आले.
गडाच्या या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, सातारा जिल्हा अध्यक्ष सागर माने, मार्गदर्शक अभयराज शिरोळे, दीपक प्रभावळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
चौकट
असे झाले बांधकाम
बांधकाम करणार कोण, असाही प्रश्न सह्याद्री प्रतिष्ठान पुढे होता. त्यासाठी चंदनकर इंजिनिअरिंग रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत चर्चा झाली. तज्ज्ञ आणि मार्गदर्शकांशी चर्चा करून डिझाइन तयार केले. स्थानिकांना विश्वासात घेऊन २७ जानेवारी २०२१ ला भूमिपूजन करण्यात आले. गडावर मशिनरीचे सुट्टे पार्ट नेऊन जोडले अन् अत्याधुनिक यंत्रणा वापरून काम करण्यात आले. त्यामध्ये शॉटक्रिट फवारणी तंत्रज्ञान, ड्रिलिंग, बोलटिंग-ग्राऊटिंग, तटबंदीच्या पायावर वजन न वाढवता, जिओ फोम, जिओ नेट, वायर रोप, बेअरिंग प्लेटचा वापर करण्यात आला. बांद्रा सिलिंकला जी वायर रोप लागली ती येथे वापरण्यात आली. लोखंडी ताराची जाळी, तराई काम करण्यात आले. अन् अखेर १ मे २०२१ ला काम पूर्ण झाले.
चौकट
बावीस दिवसांत २१ लाखांचा निधी
संवर्धनाचे कार्य हाती घेतले अन् त्यासाठी आर्थिक बाब महत्त्वाची होती. सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्य़ांनी आवाहन करताच अभिजित पानसे यांनी फोन करून मदत केली. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाच लाख रुपयांचा निधी दिला. अनेक संस्था, शिवभक्त सह्याद्री प्रतिष्ठानच्या पाठीमागे उभ्या राहिल्या. अवघ्या २२ दिवसांत २१ लाखांचा निधी उभा राहिला.
फोटो ओळ
खासदार उदयनराजे यांनी काम पूर्ण झाल्याचे घोषित करतेवेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे, दीपक प्रभावळकर, अभयराजे शिरोळे, अमितराजे राजेशिर्के, रणजितसिंह गरुड, इंद्रजितसिंह घोरपडे, गजेंद्र गडकर व इतर.
फोटो २ गडाच्या तटबंदीचे पायाड बांधून काम करतानाचे छायाचित्र.